मला हि कादंबरी फार आवडली कारण मी त्या भागातला आहे. आणि लेखकांनी जे लिखाण केले आहे ते मी लहानपणी स्वत च्या डोळ्यांनी पाहिले आहे. आणि आजसुद्धा मी ज्या वेळी गावी जातो त्यावेळी त्या गोष्टींचा थोडाफार प्रमाणात अनुभव येतो.
आता मास्तर म्हणजे “राजाराम विठ्ठल सौंदणीकर”. ज्यावेळी विभूतवाडी ते बनगरवाडी प्रवास करतात, त्यावेळी किती वाजले माहित नसताना ते प्रवास करतात. आणि बराच वेळ झाल्या नंतर तांबड फुटते म्हणजेच, सकाळ होते. आणि पुढे गेल्या वर त्यांना भूक लागते. पण पाणी नसल्यामुळे मास्तर जेवत नाहीत. पण भाकरी, सांडगे, लसणाची चटणी यांचा वास मात्र येत राहतो. मास्तर कसे बसे बनगरवाडीत येतात बनगरवाडी म्हणजे मोकळे माळरान आणि बाजरीची राने. घरे म्हणजे खपलीच्या काडाने शेकरलेली. मास्तर ज्या वेळी गावात येतात त्या वेळी एक माणूस त्यांना अंडेवाला आहे का अस विचारतो?
तसेच लंगोटी लावून शाळेत जावे आणि थुंकीने पाटी पुसावी असा मास्तर असतो का ? म्हणजेच मास्तर किती लहान पोरगा असावे ?
संध्याकाळी कारभारी येतात मास्तरांना निहाळतात. चुकलेल मेंढरू निहाळावे अश्या पद्धतीने मास्तरांकडे पाहतात आणि ओळख पटल्यानंतर शाळेची चावी देतात म्हणजेच चावी देणे म्हणजे कामाचा चार्ज दिल्यासारखे झाले. शाळा म्हणजे काय चावडीतील २ खण जागा.
मास्तर ने विचारले, पोरे कुठे आहेत, तर पोरे शेरडा मागे आहेत. जेवण झाल्यानंतर सर्व गावकरी चावडीजवळ आले. आणि कारभारी यांनी सर्व गावकरी मंडळीना सांगितले, “उद्या पासून पोरे शाळेत पाठवा”.
काही जणांनी होकार दिला काही जणांनी नकार दिला. शाळेत पाठवायचे म्हणजे त्यांच्या पोटाला काय घालावे असे काहीजण म्हणाले. तर कारभारी म्हणाले पोरे जर मरु लागली तर माझ्याकडे पाठवा म्हणजेच कारभारी अज्ञानी असताना, त्या काळी शिक्षणाची तळमळ किती होती ते इथून दिसते.
सकाळ झाली म्हणजे ‘तांबड फुटले’ कि ज्या ठिकाणी वाघरी मध्ये मेंढर कोंडलेली असतात ते मिळविण्याची कामे केले जाते. म्हणजेच लहान पिल्ले वेगळी आणि मोठे वेगळी असतात . त्यांना एकत्र मिळविणे म्हणजे दुध पाजणे आणि मेंढक्याना पण दुध लागते ते झाले कि मेंढरे घेऊन रानात चरण्यासाठी जातात.
मेंढक्यांसोबत त्यांची मुले पण जातात. मुले शिकली म्हणजे त्यांचे शेतातील लक्ष उडते. ते पांढरे कपडे घालतात. अशी त्या काळी विचारसरणी होती थोडक्यात काय तर शिक्षणाला त्या काळात किंमत नव्हती.
नव्याने जर मेंढरे राखावयाची असेल, तर त्याकाळी एक पद्धत होती, ती म्हणजे मेंढरे विकत घ्यायची नाहीत. तर त्या मेंढक्याने एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यामध्ये भंडारा टाकावयाचा आणि ज्याच्या कडे मेंढरे आहेत त्याच्या कडे जायचे. आणि ती वाटी त्याला द्यायची आणि म्हणायचे मी बेन करतोय. त्यानुसार तो मेंढका दुसऱ्या मेंढक्याला २ किंवा ४ मेंढ्या देतो. आणि मग तो व्यवसायाला सुरुवात करतो. त्यासाठी एक नियम असतो, दिलेल्या मेंढ्या विकायचं नाहीत. तसेच कापायच्या नाहीत.
रामा बनगर यांचे वडील ‘काकूबा धनगर’. त्या वेळी पैसे बँकेत ठेवण्याची पद्धत नव्हती. तर ते पैसे मडक्यात ठेवायचे. ते चांदीचे रुपये होते ते किती होते ते माहित नव्हते. मात्र ते मोजण्यासाठी त्यांनी मास्तरांच्या कडे दिले. तर ते ३४० रुपये होते. आणि हे पैसे मोडण्यासाठी मास्तरांकडे देऊण टाकले. मात्र देताना त्यांना शंका आली नाही. याचा अर्थ त्या काळात मास्तरांवर मोठया प्रमाणावर विश्वास होता.
मास्तरांची कामे – मुलांना शाळेत शिकविणे हे मुख्य काम मास्तरांचे असते. मात्र त्याशिवाय मनी ऑर्डर लिहीणे, पत्र लिहिणे, पत्र वाचणे, नवराबायकोंची भांडणे मिटविणे, कोणाचे मेंढरू चोरीला गेले ते पाहणे थोडक्यात शाळा म्हणजे कोर्ट, चावडी, पोलीस ठाणे हे होय.
गावातील भांडणे गावाबाहेर जात नसत तर ती शाळेतच मिटत असत. एवढे काम कमी कि काय म्हणून अंजीची चोळी सुद्धा मास्तरांनी तालुक्यावरून शिवून आणली.
लग्नाची पद्धत- सध्या वर्षभरात लग्न होत राहतात. मात्र जुन्या काळी गावामध्ये वर्षातून एकदाच लग्न करण्याची पद्धत होती. त्यामुळे बराच प्रमाणात खर्च आणि वेळ वाचत होता. आणि एखाद्या गरिबाचे सुद्धा लग्न होत होते.
दादू बालटया – हा गावाचा टग्या होता. त्याने कारभारी व मास्तर यांची भांडणे लावली. अंजीला चोळी आणून दिली म्हणून कान भरले.
आनंदा रामोशी – गावात हिंडणे, मिळेल ती कामे करणे, चोऱ्यामाऱ्या करणे, मास्तरांचे पैसे याने चोरून नेले. मात्र ते त्याने त्यांना परत आणून दिले. आणि ‘फिर्याद करा किंवा तुरुंगात डाबा नाहीतर मोकळे सोडा’ असा तो म्हणाला. कोणी मागून देत नाहीत म्हणून मी मुकाटयाने नेतो. गुरे आणि पाखरे खातात तस आनंदाने खाल्ले म्हणा.
ज्या वेळी पेरलेल्या रानात पिके तयार होतात. आणि काढणीला येतात. त्या वेळेच वर्णन लेखकाने छान केले आहे. बाजरी हळू हळू वाढू लागली, कि पक्षी कणसे खाण्यासाठी जमा होतात. पहाटे शेतकरी राखणीला येऊ लागतात. रानात सर्वाना कामे मिळू लागतात. बायका पोरांना दुसऱ्यांच्या शेतात किंवा गावात रोजगार मिळू लागतात. मेंढरांना खाण्यासाठी चारा मिळाल्याने ते गुबगुबीत दिसू लागतात. बारा बलुतेदारी गावागावात फिरू लागतात. आणि धान्याची मागणी करू लागतात. कोल्हाटी उद्या मारू लागतात, दरवेशी अस्वले घेऊन खेळू लागतात, गारोडी हातचलाखी दाखवू लागतात. आणि मग शेतकरी त्यांना शेर पायली धान्य देतात. धनगराची पोरे गजी ढोल खेळू लागतात. आणि सर्व बनगरवाडी नाचू लागते, “इदिबांग डिपांग” “इदिबांग डिपांग”.
कारभारी आणि मास्तर बरेच दिवस बोलत नव्हते. त्यांच्यात कडू पण आला होता. मात्र आता ते बोलू लागले.
मास्तरांच्या मनात गावामध्ये एखादी इमारत किंवा तालीम असावी असी कल्पना सुचली. त्या वेळी त्यांनी रामोशी पाठवून गावात सर्वांना निरोप दिला. सर्व जण रात्री शाळेजवळ जमले. मात्र पैसे जमविणे हे कठीण काम होते. मग ज्यांच्याकडे पैसे नसतील त्याने रोजगार देणे, ज्याच्याकडे झाडे होती त्याने झाडे देणे, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याने पैसे देणे असे ठरले .
बाळा बनगर – बाळाने झाडे देण्याचे काबुल केले होते. मात्र नंतर त्याने नकार दिला. झाड देणार नाही अस बोलला. झाडावर कुऱ्हाड चालविण्यापेक्षा माझ्यावर प्रथम चालवा असा तो म्हणाला. गावकऱ्यांनी निर्णय घेतला कि, “बाळाला वाळीत टाकायचे”. हि बातमी सर्व गावात पसरली. कोणी त्याच्याशी बोलेना. त्याचे बकरे कापण्यासाठी आयबु ने नकार दिला. रोजगारासाठी कामासाठी त्याच्याकडे कोणी
जाईना, गावातील पाणी त्याला मिळेना, तसेच कोणी गुरे चारू देईना, त्यांची पोरे शाळेत येईना झाली. ऐवढे होऊनही बाळा बनगर नमते घेत नव्हता. त्यामुळे गावात त्याची सतत अडवणूक होत होती.
तालमीचे बांधकाम चालू होते. ते थोड्या प्रमाणात पूर्ण झाल्या नंतर उद्घाटनासाठी मास्तरांनी सरकारला निमंत्रण दिले. उद्घाटनासाठी २० एप्रिल तारीख ठरली, म्हणून सरकारी अधिकारी, कर्मचारी गावात येऊ लागले. तालुक्याहून वाडीला जोडणारा रस्ता तयार झाला. शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी झाली. सारे गाव कामाला लागले. गाव स्वच्छ झाले. रामोशीवाडा स्वच्छ झाला, म्हणून धनगरी बायकांना इसाळ आला. त्यांनी त्यांची घरे सारवली. सरकार गावात येणार म्हणून गावात मोठा बदल झाला. आजपर्यंत कोणी राजा कसा दिसतो ते पाहिलं नव्हते. कधी वाडीकडे ढुंकून न बघणारे अधिकारी, पाटील, कुलकर्णी, मामलेदार, आणि फौजदार वाडीला येऊ लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता उद्घाटन होणार होते. मात्र तालीम अजून उघडी होती. झाकलेली नव्हती. म्हणून सर्व गाव रात्रभर जागून ती इमारत झाकली. मात्र हे काम करताना आयबू पडला अन बेशुद्ध झाला.
गावात सरकार आले, पोरे काखेला मारून धनगरणी वेशीकडे धावू लागल्या, राजा गावात येताच कारभारी यांनी एक नारळ आणि एक रुपया त्यांना दिला. त्यांनी हात लावला ती एक पद्धत असते.
तालमीचे बंद दार राजाने हाताने उघडले. लाल माती बघून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मास्तरांचे नाव विचारले, ‘राजाराम विठ्ठल सौंदणीकर असे मास्तरांनी उच्चारले. राजांनी त्यांना शाबासकी दिली. तालमीतील मारुतीला नारळ फोडला, सभा सुरु झाली, मास्तरांनी भाषण केले, महाराजांनी सर्वांचे आभार मानले, आणि निघून गेले. सगळ्या कार्यक्रमात तीन जण मात्र नव्हते एक बाळा बनगर, त्याने झाडे दिली नाही. म्हणून त्याला वाळीत टाकले होते. दोन दादू बालटया आजारी असल्यामुळे, आणि तीन आयबु तालमीचे काम करताना वरून पडल्यामुळे.
तालमीचे काम करताना आयबु पडला, व हात मोडला. म्हणून जगण्या रामोशी आला, त्यांने हात निट बसविला. म्हणून आयबु आता हिंडू फिरू लागला. जगण्याने मात्र एक भानगड केली. वांगी गावातील चांगल्या घरातील एक बाई पळवून आणली. त्यामुळे त्या गावातील ८ ते १० लोके रामोशी वाड्यात आली. त्यांनी रामोशी वाड्यात सर्वाना मारहाण करण्यास सुरुवात केली. व जगण्या रामोशी कुठे आहे असे ते विचारू लागले. मास्तरांना सर्व चौकशी केल्या नंतर त्यांचा राग शांत झाला. त्यांना तालमीत नेऊन चहा पान केला, आणि ‘जगण्या व ती बाई त्यांना तुमच्या ताब्यात देतो’ अशी हमी आनंदा रामोशीने दिली. तेव्हा ती लोके निघून गेली. आणि हमी घेतल्यानंतर २-४ लोके घेऊन सांगली मध्ये पळून चाललेला जगण्या व ती बाई यांना पकडून आणले आणि वांगीच्या लोकांच्या ताब्यात दिले त्या लोकांनी त्या बाईच नाक कापले, आणि सोडून दिले. थोडक्यात काय तर रामोशी समाजातील माणसांनी दिलेला शब्द पाळण्यात पक्के असतात.
तांबड फुटलं, त्यावेळी गावातील कारभारी यांना स्वप्न पडले, कि कंबरेला कडू लिंबाची डहाळी बांधलेली, केस मोकळे सोडलेली, मळवट भरलेली एक बाई आली आणि म्हणाली कि, ‘मी तुला नेण्यासाठी आलेली आहे’. कारभारी घाबरला आणि गावात सर्वांना सांगत सुटला, “मी आज मरणार आहे”. कोणी चेष्टा केली पण त्याचा काही परिणाम झाला नाही. सर्वांनी रडण्यास सुरुवात केली तर कारभारी म्हणाला रडता काय माझ काय राहील आहे. ऐवढे मोठे पंतसरकार येऊन गेले माझ्या पाठीवर हात ठेवला, आणि काय पाटील म्हणून विचारले. थोडक्यात काय तर अडाणी लोकांना सुद्धा मोठ्या लोकांनी नुस्त विचारलं तरी केवढा मोठा आनंद होतो. पण सूर्योदयाला कारभारी मरुन गेले.
कारभारी मरून गेले मात्र जाताना अंजीचा सांभाळ करण्यासाठी शकुच्या हवाली केले. सर्व सुरळीत चालले होते. मात्र शकूचे आणि अंजीचे प्रेम संबंध चालू झाले. हे शकुच्या बायकोच्या लक्षात आले. आणि त्यांनी मास्तरांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यामुळे शकूची बायको शकुपासून वेगळी राहीली. आणि शकू आणि अंजी एकत्र राहू लागले. मात्र थोड्याच दिवसात अंजी एका मेंढक्याचा हात धरून निघून गेली. आणि नंतर शकू आपल्या पहिल्या बायकोकडे आला, तेव्हा शकूची बायको मास्तरांकडे आली आणि म्हणाली “मास्तर आल आमच खूळ माघारी”
दुष्काळ पडला – नक्षत्रा मागून नक्षत्र गेली. बनगरवाडी पाण्याचा ठिपूस पडला नाही. झाडे झुडपे वाळून गेली, विहीरीच पाणी आठले, चिमणीला प्यायला सुद्धा पाणी मिळेना. लोकांच्या तोंडावरची कळा नाहिशी झाली. डोळ्यात भूक दिसू लागली. रामोश्यांचे फार हाल झाले. २- २ दिवस चुली पेटेनात. तालीम ओस पडली, शाळा ओस पडली. माणदेश्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ आला. मेंढरे पट पट मरू लागली. रामोश्याचा दारूचा धंदा बंद पडायला लागला. दारूला कोणी गिऱ्हाईक मिळेना. वांगीची बाई पळवणारा जगण्या रामोशी दारू पिऊन पिऊन मरून गेला. शकुने बैल विकायला काढला, मात्र तो बैल खटकाने सात रुपयाला मागितला. पण त्याने दिला नाही. कोणी जनावर विकायला काढले, तर घेणारा त्याला खाण्यासाठी काय घालनार. म्हणून घेत नव्हता. एके दिवशी आनंद रामोशी आला आणि मास्तरला म्हणाला. जातो जगायला मास्तर मी. आणि जाता जाता म्हणाला, बालटयाला मी आणि आयबुने मिळून मारला “तुम्हाला लय त्रास देऊ लागला म्हणून मारला”.
रामोश्यांची सगळी माणसे गावाबाहेर पडली. रामुसवाडा रिकामा झाला. मेंढरे मरू लागली. म्हणून मेंढक्यानी गाव सोडले. रामा बनगर जाण्यापूर्वी मला भेटला आणि मी सुद्धा गाव सोडून चाललो आहे. तेवढ म्हातार काकूबा धनगर यांच्या वर लक्ष ठेवा अस सांगून गेला.
रामा बनगर, शकू, आनंद, बालटया आणि बाळया सगळे नाहीसे झाले. बरे वाईट सगळे गेले, शाळा तेथेच राहीली तालीम तेथेच राहिली. घरे, झाडे जीतल्या तिथे राहिले. आणि मंडळी निघून गेली. गावात कोणी दिसेनासे झाले. मी घरून आणलेल्या भाकरीतून २ दिवसाच्या शिळया भाकरी आयबु ला दिल्या.
एके दिवशी मला वरिष्ठांकडून पत्र आले, कि शाळा बंद करून तालुक्याच्या प्रायमरी स्कूल मध्ये दाखल व्हा. मी सामान सुमान बांधले. एक ठीके आयबुने डोक्यावर घेतले आणि काही मी घेतले. आयबू म्हणाला “हे गबाळ तुमच्या घरी टाकून मग मी माघारी जाईल”. उजाड बनगरवाडी मागे राहिली होती आणि मी परत चाललो होतो.