Share

“जगात प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते.. कधीतरी आपण.. उपजीविकेचा विचार न करता, मनमोकळं फिरावं.. जगभर प्रवास करावा.. विविध अनुभव गाठीशी बांधावे आणि आत साचलेला प्रवाह.. वाहता करावा. परंतू असं किती लोकं करतात? किती लोकांना शक्य आहे हे करणं? आणि त्यात जर तुम्ही मुलगी असाल तर? अनेक अडचणी.. अनेक किंतू.. अनेक परंतू.. ताशातही तुम्ही धाडस केलंच तर, राहायचं कुठे.. खायचं काय? अशी असंख्य विघ्न. पण ही सुप्त इच्छा पूर्ण केलेली एक मुलगी आहे.. तिने फक्त भारत नाही.. तर युरोप पालथा घातला.. नवनवीन अनुभव पाठीशी घालत, स्वताच्या कक्षा रुंदावल्या.. आणि आपल्या लिखाणातून लोकांच्या भावनेच्या, बुद्धीच्या, व विचारांच्या कक्षा विस्तृत केल्या.

“”अनुराधा बेनिवाल”” यांचा हा रोमहर्षक प्रवास आहे.. भाषा साधी आहे.. लेखणी संवेदनक्षम आहे.. जगाकडे बघण्यासाठी आवश्यक असणारी दृष्टी व्यापक आहे.. दृष्टिकोन अगदी निखळ आहे.. आणि या प्रत्येक विशेष बाजूच्या चौकटर्टी मोडू पाहणारी एक आझाद, जिज्ञासू मुलगी, मनातला सततचा कोलाहल प्रवासाच्या अनुभवातून शांत करत आहे. याच उस्फूर्त झऱ्यातून तयार झालेलं एक सुंदर पुस्तक म्हणजे “”माझा ब्रँड… आज़ादी!””

एक बुद्धिबळपटू ते आधुनिक फाकिरन.. हा प्रवास या पुस्तकातून लेखिकेने उलगडला आहे. अचानक एक परदेशी बेफिकीर मुलगी पुण्यात भेटते काय नि.. वर्षानुवर्ष साचून राहिलेल्या एका फुग्याला टाचणी टोचून जाते काय.. तिथून लेखिकेचा प्रवास सुरू होतो.. एकटीनेच युरोप फिरण्यासाठी ती सज्ज होते. अकल्पित.. नियोजन नाही.. अनुभव नाही आणि कोणी सोबतही नाही. प्रवासात लागणारा वेळ.. तपशील असल्या निरर्थक माहितीचा हा प्रवास नाहीये. तिथे भेटलेले लोक.. त्यांचे स्वभाव.. काही जाणवलेलं.. काही भिडलेलं.. काही विचित्र तर काही थक्क करणारे किस्से.. अशा अकारा शहरातील कथानी हे पुस्तक पुढे नेलं आहे.

युरोपातील.. अनेक माहिती असलेले.. आणि माहिती नसलेले शहरं लेखिकेने.. तिथल्या स्थानिक घरात राहून अनुभवले. रस्ते पालथे घालून पाहिले. प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात हे देखिल किती फोल आहे. हे दाखवून दिले. प्रवासाची आवड आणि माणसं समजून घेण्याची तयारी.. इच्छा.. यातून लेखिकेची प्रगल्भतेकडे होणारी वाटचाल स्पष्ट होते. काही संवाद अक्षरशः तुम्हाला प्रेमात पडतात.. तर काही विचार करायला भाग पाडतात.

“”आईची मित्रमंडळी? मी विचारात पडले. गेल्या तीस वर्षांत मी माझ्या आईच्या मैत्रणी पाहिल्या नव्हत्या. आईच्या स्वतःच्या मैत्रिणी? ती पपांच्या मित्रांच्या बायकांशी मैत्री करायची, किंवा माझ्या दोस्तांच्या आयांशी, जे मला आवडतं तेच माझ्या आईलाही आवडतं. मला जे पदार्थ आवडतात तेच ती करते नेहमी. आईला कोणती भाजी आवडते बरं? बराच वेळ मी तोच विचार करत राहिले.””

आईबद्दल असा विचार कधी केला होता आपण? अशाने अवाक् व्हायला होतं. परंपरेची ओझी वाहून थकलेल्या मुलींच्या वतीने हे लेखिकेने पुकारलेलं बंड आहे. त्याला वाचा फोडली आहे. प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाऊन उत्तरे शोधली आहेत. लैंगिकतेपासून ते अध्यात्मापर्यंत.. खानपानापासून ते राहणीमानापर्यंत कोणत्याही विषयाला अलगद हात घालून.. त्यावर स्वतःचं असं मत असणारं हे पुस्तक आहे. प्रत्येक मुलीने वाचावं असं पुस्तक तर आहेच.. पण त्याहूनही जास्ती, मुलांनी वाचून त्यातील आज़ादीचा अर्थ समजून घ्यावा.. प्रत्येकाच्या संग्रही असावं असं पुस्तक आहे. जरूर वाचा!”

Related Posts

रिच डॅड पुअर डॅड

Nilesh Nagare
Shareरॉबर्ट कियोसाकी हे अमेरिकन उद्योजक, गुंतवणूकदार, आणि लेखक आहेत. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी Rich Global LLC आणि Rich Dad...
Read More

श्यामची आई

Nilesh Nagare
Shareसाने गुरुजींनी लिहिलेले श्यामची आई हे मराठी साहित्यातील एक अमरकृती आहे. या आत्मचरित्रात्मक कादंबरीत लेखकाने आपल्या बालपणीच्या आठवणी आणि मातृप्रेमाचे...
Read More