Book Review : Santosh Ramdas Jagtap, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.
ऐतिहासिक काल्पनिक प्रणय मध्ये पानिपतचे सेनापती सदाशिवरावभाऊंची दुर्दैवी पत्नी पार्वतीबाई नायिका आहे, तर ‘राजेश्री’ मध्ये शिवाजी महाराजांच्या मनःस्थितीचे वर्णन आहे.
इनामदार यांचा जन्म गोमेवाडी (जि. सांगली) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संतराम विष्णू इनामदार-गोसावी, आईचे नाव आनंदीबाई होते. वतनाचे गाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातल्या येरळा नदीकाठचे येरकाळवाडी हे होते.
त्यांचा बालपणाचा बराचसा काळ ‘गोमेवाडी’ या जन्मगावाच्या सान्निध्यात गेला. शालेय जीवनातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित होऊन ते त्याचे कार्यकर्ते झाले. मॅट्रिक उत्तीर्ण होण्यापूर्वी संघाच्या ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्पचे (संघ शिक्षा वर्गाचे) तीन वर्गांचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. संघप्रचारक बाबूराव मोरे यांचा त्यांच्या वागणुकीवर उल्लेखनीय प्रभाव पडला. ‘माझ्या जडण-घडणीमध्ये संघाचा भाग महत्त्वाचा आहे, हे मला मान्य करायला हवं’ असे ते सांगत.
इनामदारांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या नवीन मराठी प्राथमिक शाळेत झाले, नंतर अहमदनगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. तेथे त्यांनी वाचनाची हौस मनमुराद भागवली. ‘दुष्काळातून उठलेल्या अधाशी माणसाप्रमाणे मी त्या वेळी किती पुस्तके वाचली असतील, ह्याची गणती ठेवलेली नाही.’ असे ते म्हणत असत. इंग्रजी पुस्तके, रहस्यकथा, चित्रकला, वास्तुकला, संगीत, कृषी, वैद्यक, अर्थशास्त्र, विज्ञान, इत्यादी विविध विषयांची पुस्तके नगर व औंध येथील ग्रंथालयांतून मिळवून त्यांनी अफाट वाचन केले.
याच काळात त्यांच्यावर पंडित सातवळेकर, गो.नी.दांडेकर यांचाही प्रभाव पडला. बनारस हिंदू विश्वविद्यालय व अलिगढ विद्यापीठ ह्यांच्या परीक्षा देऊन ते पदवीधर झाले. त्यासाठी औंधच्या यमाई हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरीही केली.
अर्थशास्त्राची एम.ए.पदवी घेतलेले इनामदार ‘सकाळ’, ‘केसरी’ या वृत्तपत्रांत लेखन करू लागले. “माझ्या व्यक्तिमत्त्वाला हा (साहित्य निर्मितीचा) सुडौल आकार पुण्याने दिला .” असे त्यांनी म्हटले होते. नोकरीत बढतीसाठी दिलेल्या परीक्षेविषयी ते लिहितात, “त्या वेळच्या मुंबई राज्यातून आलेल्या सर्व उमेदवारांत मी सरकारी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं पास झालो होतो.”
‘चांदराती रंगल्या’ या आत्मकथा : दोनमध्ये ‘हे सारस्वताचे झाड’ या अगदी छोट्या प्रस्तावनेत ते लिहितात, “जीवनाच्या वाटेवर सारस्वताचं हे झाड दिसलं. त्याच्या शेजारी मी प्रथम विसावलो तो औंधात. त्यानंतर अर्ध शतकापर्यंत मी या सारस्वताच्या वनामध्ये विहार करतो आहे. ….या प्रवासातल्या कष्ट-साहसाच्या समयीच्या सोबत्यांना, मार्गदर्शकांना, सहप्रवाशांना मी आठवतो आहे.”