Share

समकालीन मराठी कादंबरी समाजाच्या सर्वस्तरीय जीवनाला उजेडात आणणारी आणि नानाविध समाजघटकांच्या विविधांगी प्रश्न-समस्यांना मुखर करणारी आहे. विशेषतः बदलत्या ग्रामसंस्कृतीचे, बाह्य जगताचे व त्या संपर्कातून निर्माण झालेल्या जटिलतेचे सखोल चित्रण मराठी कादंबरीमध्ये येऊ लागले आहे, हे आशादायी चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत झाल्यामुळे मराठीसह सर्वच भाषांमध्ये समग्र जनसमूहांच्या जीवनचित्रणाचा प्रचंड मोठा अनुशेष भरून काढण्याचे काम ओघानेच सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर समृद्ध माणदेशी साहित्य दालनात विठ्ठल आप्पा खिलारी या नव्या दमाच्या लेखकाच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सवळा’ या कादंबरीची भर पडली आहे. या कादंबरीमुळे लोणारी समाजाच्या बोलीचा मराठी जनमाणसाला प्रथमच परिचय होत आहे.
सातारा जिल्ह्याचं अगदी शेवटचं टोक असलेलं शेणवडी हे विठ्ठल खिलारी यांचं गाव. आटपाडी तालुक्यातलं झरे हे गाव ओलांडून पंढरपूर रस्त्याने पुढे आलं की, शेणवडी हे गाव येतं. इथूनच माण तालुका सुरू होतो. शेजारी पाच कोसांवरच सांगली जिल्ह्याची हद्द आणि दिघंची येतं. कायम दुष्काळी प्रदेश असलेल्या या माणदेशात सृजनाचा जणू काही गोड झराच वाहतो आहे. माडगूळकर बंधूंच्या साहित्यातील मातब्बरीनंतर शंकरराव खरात, मेघा पाटील, सिताराम सावंत, बाळासाहेब कांबळे, संतोष जगताप, नवनाथ गोरे, गणेश बर्गे, नागू वीरकर व विठ्ठल खिलारी अशी परंपराच निर्माण झाली आहे.
समाजाकडे बघण्याची विलक्षण संवेदनशील दृष्टी लाभलेल्या खिलारी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण याच भागात झाले. महाविद्यालयीन शिक्षण आटपाडी महाविद्यालयात सुरू असताना ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस यांच्या भाषणाने प्रभावित होऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापुरला विद्यापीठाची वाट धरली. येथे गवस सरांच्या सहवासात त्यांची साहित्यिक प्रतिभा उजळून निघाली. ‘मुराळी’ या राजन गवस यांच्या मासिकातूनच खिलारी यांच्या कथा प्रथम प्रसिद्ध झाल्या.
‘सवळा’ ही त्यांची पहिलीच कादंबरी. ऊसतोड कामगाराच्या घरात जन्मलेल्या मनहळव्या मुलाची ही अश्रूभरी कहाणी आहे. म्हंकाळी हा या कथेचा नायक आहे. त्याच्या जन्मापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा पट कादंबरीत चितारला आहे.‌ वस्तूत: माणदेशात पशुपालन हा मुख्य व्यवसाय असला तरी माणदेशातूनही ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. सहकारी साखर कारखाने, नव्याने निर्माण झालेले साखर सम्राट, शोषण व्यवस्था बळकट करणारे मुकादम, उचल घेण्याची पद्धत, टोळ्यांचे पालावरचे जग, मोठ्या जमीनदारांची आरेरावी, पिढ्यानपिढ्या ऊसतोड कामगारांच्या जगण्यातून न हटणारा दुःखाचा पर्वत, साखर शाळांचे फसवे वास्तव, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असलेला ‘कोयता’, ऊसतोड कामगारांचे माणूसपण हिरावले जाऊन ‘कोयता’ हीच त्यांची ओळख बनणे अशा शेकडो भीषण समस्यांचा उहापोह म्हंकाळीच्या या कर्मकहाणीत झाला आहे.
जन्मल्यानंतर तब्बल नऊ दिवस कंठ न फुटलेल्या म्हंकाळीला आयुष्यात पुढे वाढवून ठेवलेली जीवघेणी ससेहोलपट अधिकच निःशब्द करते आहे. निर्विकार मनाने जीवनाकडे पाहणारा म्हंकाळी मानवी स्वभावाचे सूक्ष्म पदर उलगडून दाखवतो आहे. खरे पाहता खिलारी यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी आहे.
गरिबीमुळे संसाराचा गाडा ओढण्यासाठी ऊसतोडणीला जाणाऱ्या कामगारांना अंगावर पित्या लेकरांनाही घरी ठेवावे लागते. त्यांची होणारी ताटातूट हृदय पिळवटून टाकणारी आहे. एकदा टोळी बाहेर पडली की, पाच-पाच, सहा-सहा महिने कधी कधी आठ-आठ महिने देखील घराकडे परतून न येणाऱ्या आणि आपल्या लेकरांविषयी असलेले प्रेम उसाच्या फडात पाचटीखाली दडपून टाकणाऱ्या कामगारांचे दुःख खिलारी यांनी प्रत्येकारकपणे मांडले आहे. तान्ह्या बाळाच्या आठवणीने फुटलेला पान्हा ऊसाच्या फडात पिळून टाकण्याचा प्रसंग ह्रदयाला पाझर फोडणारा आहे.
कादंबरीच्या आशयसूत्रांमध्ये ‘कोयता’ नशीबी येऊ नये म्हणून शिक्षणाची कास धरणाऱ्या मुलाचे भावविश्व प्रामुख्याने आले आहे. शिक्षणासाठी मामाकडे राहणाऱ्या या पोराला शाळा आणि शिक्षणापेक्षा घरातील हक्काच्या घरगड्यासारखे राबवले जाते. पोराची होणारी घालमेल आई-वडिलांना कळत असूनही हतबल झालेले ते काहीही करू शकत नाहीत. अत्यंत प्रतिकूलतेतही तो तग धरून राहतो. कर्मवीरांच्या कमवा शिका योजनेचा आधार घेऊन शिक्षणाचा प्रवाह सोडत नाही. याच काळात जीवनातील किशोरावस्थेचे वळण आणि काही गुलाबी क्षणांचा शिडकावा त्याच्या वाळवंटी आयुष्यावर होतो. परंतु अपूर्णतेच्या शापाने ती प्रेमकहाणी संपून जाते. म्हंकाळीच्या आईचा मृत्यू ही या कादंबरीतील एक अत्यंत हळवी जागा आहे.
‘सवळा’ या कादंबरीचे बलस्थान म्हणजे तिची अस्सल माणदेशी भाषा. ती जशी बोलली जाते, अगदी तशीच लिहिण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या लोणारी बोलीला एक आंतरिक लय आहे. माणदेशातील असंख्य अपरिचित शब्द व वाक्प्रचारांचा भरणा या कादंबरीत आहे. या भाषेमुळे कादंबरीला कमालीचे चित्रदर्शित्व प्राप्त झाले आहे.
कादंबरीच्या तलपृष्ठावर डॉ. राजन गवस यांनी ऊन, पाऊस सोसत कोयत्याच्या आधारावर भाकरीचा तुकडा शोधणाऱ्या पोराची ससेहोलपट, कष्ट करत शिक्षण घेतले तरी या शिक्षणाचा उपयोग काय हा भयंकर प्रश्न, गरिबाच्या पोरांनी शिक्षणातून स्थिरस्थावर होण्याची शक्यताच न उरल्याचे वास्तव साररूपाने मांडले आहे.
एकंदर मराठी ग्रामीण साहित्य परंपरेत मोलाची भर घालण्याचे काम विठ्ठल खिलारी यांनी ‘सवळा’ च्या निमित्ताने केले आहे, यात शंकाच नाही.
नव्या कृषी संस्कृतीकडे पाहण्याची मर्मदृष्टी यातून मांडलेली आहे. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावलेल्या आहेत. अतिशय वास्तव आणि ज्वलंत लेखन शैलीने मतितार्थ सांगितलेला आहे. प्रत्येक संवेदनशील आणि स्वाभिमानी मानवाने वाचावे असे पुस्तक ! माणदेशातील श्रमजीवींच्या जगण्याचा सातबाराच वाचकांसमोर ठेवते, म्हणूनच काळजाला अधिकच भिडते.

Recommended Posts

सूड

Dr. Amar Kulkarni
Share

Shareनाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. बाबुराव बागुलांनी लिहिलेली सूड ही मराठी दलित साहित्यातील महत्वाची कादंबरी आहे त्यांनी समाजातील दलितांवरील असमानता अन्याय […]

Read More