Review By Dr. Pawase Vishal Bhausaheb, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune
तृतीयपंथींबद्दल वाचनाची अनेक दिवसापासून विचार सुरू होता. मग अशात स्वाती चांदोरकर यांचे ‘हिज डे’ हे पुस्तक हातात आले. या कादंबरीत हेलेना ही मुख्य नायिका व निवेदिका आहे. दुसरी नायिका आहे ती चमेली. हेलिना ही मानसशास्त्राची विद्यार्थिनी असून तृतीय पंथीयांबद्दल जाणून घेणे व त्यांचा अभ्यास करणे यात तिला रस आहे. तर चमेली ही साधारण मुलगी पण तिचे पालक हे तृतीय पंथी आहेत व तिचे सगळे आयुष्य हे त्यांच्या इलाक्यात गेले आहे. या दोघींच्या कथेतून तृतीय पंथीयांची कहाणी व अनेक पात्रांची ओळख होत जाते.
‘समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या…’
‘हिज डे’ या पुस्तकाचे भाषा ओघवती आहे. पुस्तक फार झटाझट निवेदक बदलते. तिथे वाचताना क्षणभर अडखळल्यासारखं होत. पण नंतर नंतर लेखिकेच्या ह्या शैलीची सवय होते. पुस्तकात हिजडे यांच्याबरोबर समलिंगी संबंध यावरही प्रकाश टाकलेला आहे. हिजड्यांची भाषा, त्यांचे राहणीमान याची माहिती आपणास या कथेतून मिळते. सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा तृतीय पंथीय वेगळे आहेत पण त्यांनाही मन आणि भावना असून त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपणास जाणवत जातात. लेखिका स्वाती चांदोरकर व प्रकाशक मेहता पब्लिकेशन यांनी वेगळ्या विषयाला हात घालून चांगली कलाकृती निर्माण केली आहे. याबद्दल त्यांचे धन्यवाद! वाचकांनी जरूर वाचावे असे पुस्तक आहे.
