Review By श्रीमती मनीषा कुंभार, ग्रंथालय लिपिक, Baburaoji Gholap College, Pune
तानाजी बबन धरणे लिखित हेलपाटा ही कादंबरी कादंबरी 5 मार्च 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली.पी आर ग्रुप ऑफ पब्लिकेशन अमरावती यांनी ही कादंबरी प्रकाशित केली असून या कादंबरीचे मूल्य 225 रुपये व पृष्ठ संख्या 144 आहे. ‘बापू आज पासून तुझी डोक्यावरची पाटी गेली!’ पृ क्र.137 हे वाक्य हेलपाटा कादंबरीचे प्रेरणास्थान म्हणावे लागेल. या वाक्याने या कादंबरीचा नायक तानाजीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हे वाक्य कादंबरीच्या निर्मितीचे प्रेरणास्थान आहे. हेलपाटा या कादंबरीच्या कथानकात आंबले (अनोसेवाडी), मांडवगण, बर्केगाव, राहु आणि कामाच्या निमित्ताने मुंबईचे चित्रण आले आहे.
आई, वडील, चार बहिणी ( विमल, शेवंताबाई मंगलताई, कुसुम) दोन भाऊ (तानाजी आणि नानाभाऊ ) असे हे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून मिळेल ते काम करतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतीही तक्रार न करता मुलांचे संगोपन, शिक्षण, विवाह हे सोपस्कार करतात. लेखकाचे वडील सालगडी होते. त्यामुळे कधी राखणदार, कधी सालगडी तर कधी मिळेल ते काम प्रामाणिकपणे केले. १९७२ साली मोठा दुष्काळ महाराष्ट्रभर पसरला होता. लेखकाची परिस्थिती खूप हलाखीची होती. किंबहूना महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची परिस्थिती खूपच वाईट होती. अन्न आणि पाणी या दोन जीवन आवश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण झाला होता. लेखकाने मेहनतीने ध्येयपूर्ती सध्या केली. शिक्षणाची आस होती पण कधी कधी पोटासाठी शाळा सोडून कामावर जावे लागत होते. अशाही परिस्थितीमध्ये लेखकाने आपले शिक्षण चालू ठेवले. शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षकांनी त्यांना परीक्षा देण्याची परवानगी शिक्षकांनी दाखवलेला विश्वास त्यांनी पूर्णत्वास नेला. दहावी नंतर डी एड. करायचे होते. परंतु त्याच वर्षी बारावी नंतर डी.एड. चे ऍडमिशन सुरू झाले. बारावीला 58% मार्क्स मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. बारावीच्या निकालाच्या दरम्यान ग्रामसेवकाच्या लेखी परीक्षेत ते मेरिट यादीत आले व त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. 23 जुलै 1998 रोजी त्यांना रायगड जिल्हा परिषद, रायगड – अलिबाग या ठिकाणी ‘ग्रामसेवक’ म्हणून निवड झाल्याचे पत्र मिळाले. आणि खऱ्या अर्थाने लेखकाचा हेलपाटा संपुष्टात आला.
सालगड्याचा मुलगा ते ग्रामविकास अधिकारी हा प्रवास या कादंबरीत अधोरेखित केला आहे. या प्रवासात अनेक प्रवासी भेटले काही शेवटपर्यंत बरोबर राहिले, काहींनी मध्येच साथ सोडली. पण लेखक आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. कधी डोक्यावर पाटी घेतली तर कधी मिळेल ते काम करून शिक्षणाचा ध्यास घेतला. परिस्थिती कोणतीही असो पण कष्ट करण्याची तयारी जिद्द आणि आत्मविश्वास या बळावर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हे तानाजी धरणे यांच्या हेलपाटा या कादंबरीत मांडले आहे.