Kamble Bhakti Rajendra , (Department of Sociology)
Savitribai Phule Pune University, Pune.
एकदा वर्गात मी माझ्या सरांच्या बोलण्यात एक वाक्य ऐकलं, “तू तूझ्या बुद्धीला योग्य वाटल तेच होण्याचा प्रयत्न कर फक्त तू जे करशील तेच्यात टापला जायला पायजे”. हे वाक्य होतं ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकातलं. हे कळताच मला ते पुस्तक वाचण्याची उत्कंठा वाढली आणि शेवटी मी ते पुस्तक घेऊन वाचलंच.
डॉ. नरेंद्र जाधव हे एक नामवंत शिक्षणतज्ञ, लेखक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग सिंग यांच्या म्हणण्यानुसार एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. 2006 साली डॉ. नरेंद्र जाधव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांतून ‘ आमचा बाप आन आम्ही’ हे एक.
लेखकांनी हे पुस्तक त्यांच्या वडिलांवर म्हणजेच दामोदर रुंजाजी जाधव यांच्यावर लिहिले आहे. लेखकांचे वडील हे बुद्धीप्रामाण्यवादी, प्रयत्नवादी निरीश्वरवादी होते. लेखकांच्या वडिलांना बाबा पेक्षा बाप हा शब्द जास्त रुचत असल्याने पुस्तकाचं नाव असं ठेवलं आहे. सगळ्यांना पुस्तकात लेखकांच्या बाबांचे दर्शन घडले आहे पण मला मात्र दोन बाबांचे दर्शन घडले: एक म्हणजे दामोदर रुंजाजी जाधव आणि दुसरे म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकातून शिकण्यासारखी अनेक वाक्ये आहेत. “तू जे करशील त्याच्यात टापला जायला पाहिजे”, छोटूमियां, किसी को डरने का नाही, क्या? आपुन क्या किसी के बाप का खाता है?”, “तू जो अभ्यास करशील, संशोधन करशील त्याचा रस्त्यावरचा सामान्य माणसाला उपयोग होणार नसलं तर ते सगळं झूट हाय”, इत्यादी. अंधश्रद्धा विरोधी, शिक्षणप्रेमी, महिला सक्षमीकरणाचे समर्थक, शेतकऱ्यांबद्दल कळकळ, बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून पुस्तकातून लेखकांनी त्यांच्या वडिलांचे दर्शन घडवून आणले. अस्पृशता अनुभवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, संत गाडगे महाराज यांच्या सहवासात आलेले, स्वतः अशिक्षित असतानाही आपल्या मुलांना शिक्षण देण्याची जिद्द लेखकांच्या वडिलांमध्ये दिसून येते. मला नेहमीच असं वाटत की समाजसुधारकांचे मोठमोठे फोटो, प्रतिमा घरात लावण्याआधी त्यांचे विचार डोक्यात घ्यावेत आणि ते आचरणात आणावेत आणि या पुस्तकात सुद्धा थोर समाज सुधारकांना डोक्यावर घेण्याएवजी डोक्यात घेणं अत्यंत गरजेचं आहे हे शिकायाला मिळेल. पुस्तकातल्या पत्रांचा (लेखक व त्यांच्या कुटुंबियांचा) प्रवास जातीव्यावेस्थेमुळे फारच खडतर होता. तो प्रवास वाचण्यासारखा आणि प्रेरणादायी आहे.
लेखकांची लेखन शैली ही तितकीच दमदार आहे. पुस्तक वाचून तर झालं पण एक प्रश्न मनात कोरला गेला तो म्हणजे – मी माझ्या बाबांकडून काय शिकले? ज्याचं उत्तर मी अजूनही शोधात आहे. पुस्तकात लेखकांच्या नातेवाईकांचे मनोगत थोड्या कमी पानांमध्ये असायला हवे होते. लेखकांच्या बहिणींनी सुद्धा त्यांच्या वडिलांबद्दल थोडे लिहायला हवे होते.
निळू फुलेंसारखंच मी सुद्धा, साने गुरुजींच्या ‘शामची आई’ नंतर नरेंद्र जाधव यांचं ‘आमचा बाप आन आम्ही’ हे पुस्तक मी आवर्जून सर्वांना वाचण्याची शिफारस करते.