ग्रंथ परिक्षण : खंडावी हर्षल देवराम,महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय, पंचवटी नाशिक
आमचा बाप अन आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव
स्वकमाईचा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासातून अहंकार दूर ठेवून जेंव्हा एखादा माणूस व्यक्त होतो तेंव्हा त्याच्या आयुष्याला जी झळाळी असते. डॉ. नरेंद्र जाधव ह्यांचे आमचा बाप आन् आम्ही वाचताना ह्या भावनेचा प्रत्यय येतो. नाशिक जवळच्या गावातून एक पिढी मुंबईला येते, खिशात काहीही नाही, आणि केवळ पुढच्या दोन पिढ्यांनंतर ह्या परिवारातील सर्वजण कर्तृत्ववान होऊन नवनवीन आघाड्यांवर आपली छाप सोडतात. सहज लिहिलेले सर्वच विलक्षण वाचनीय झालेले आहे.
या पुस्तकात बोलीभाषेतील संवाद आहेत. ते एकूण प्रसंगांना व संदर्भांना जिवंतपणा देतात. यात आलेली प्रमाण भाषा, लेखक आज कसा आहे, याची प्रतिमा बांधण्यास मदत करते. वडिलांचे आत्मचरित्र किती संवादी स्वरूपात लिहिले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. तेही प्रथमपुरुषी एकवचनी भूमिकेतून; जणू त्यांच्या कुडत्यात प्रवेशून, त्यातला कष्टाने कमावलेला घामट रुपया अनुभवून, त्यांच्या चालूनविरून पातळ झालेल्या वाहणांत पाय खुपसून अन् त्यातील जीर्णपणा अनुभवून! कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही आपली कामासंबंधी चिकाटी त्याने सोडली नाही. ‘आपण जे करू ते ‘ए-वन’ असले पाहिजे’, असा जणू त्याचा धोशाच होता. तो शब्दांतून व्यक्तिचित्रणात लेखकाने जिवंत केला आहे.
लेखकाचे वडील निवृत्त झाल्यावर हाताशी काही उद्योग हवा म्हणून मुलांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध करण्यास सांगितले. रूढार्थाने शालेय शिक्षण नसूनही निव्वळ अनुभवाच्या जोरावर अनेक विविध कामे केलेला हा माणूस. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मुलीचा मित्र, पेपर लाईन टाकून पोटपुरते मिळवणारा माणूस, पुढे रेल्वेमध्ये पडेल ती कामे केलेली. अनुभवाला कायम आंबेडकरी विचारशैलीची जोड. शिक्षणाच्या महत्त्वाची पूरेपूर जाणीव.
त्याच्या बाप लेखणीतून, बोलीभाषेतील अदमासे ५० एक पानांचा ऐवज लिहून झाला. घरच्यांनाही तो आवडला. त्याला पुस्तक रूपाने प्रसिध्दी द्यावी असही ठरलं. मग पुढच्या दोन पिढ्यांनी वडिलांच्या लेखनाच्या पुढे त्यांचे स्वतःचे विचार मांडले आणि हे पुस्तक आकाराला आलं. आज अनेक भाषांमध्ये ह्याचे अनुवाद झालेले आहेत, अनेक पुरस्कारांचे मानकरी हे पुस्तक ठरलेले आहे. शिक्षण आणि वाचन ह्यांची गरज ओळखून वडिलांनी मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिलं. आंबेडकरी विचारांची शिदोरी त्यांनी आपल्या मुलांबरोबरही दिली.
नरेंद जाधव ह्यांचं वाचन अफाट असलच पाहिजे. कारण त्यांच्या लेखनशैली मधून तत्कालीन प्रतिष्ठित लेखक डोकावतात. मधेच एखादी कवितेची ओळ असो किंवा विनोदाची थोडीशी पेरणी, त्यांचं लिखाण सहजसुंदर झालेलं आहे.
हे पुस्तक सर्वांसाठी आहे. स्वतः निवांत राहून नशिबाला किंवा सरकारला बोल लावणाऱ्या सर्वांनाच एक शिकवण देणारं आहे. शिक्षणाचं महत्त्व अनेक पटींनी अधोरेखित करणारं हे तीन पिढ्यांचं चरित्र मार्गदर्शक आहे, प्रेरणादायी आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या जबाबदारीची आणि उत्तरदायित्वाची जाणीव करुन देणारं आहे. आंबेडकरांच्या कार्याला त्यांच्या शिकवणुकीला सार्थ ठरवणारी ही सत्यकथा आहे. ह्याच्या अनेक आवृत्त्या निघण्याची गरज आहे आणि शालेय अभ्यासक्रमात ह्यातील उतारे समाविष्ट होण्याची देखील गरज आहे.