Ashwini Vidya Vinay Bhalerao (M.A. Marathi)H.P.T Arts and R.Y.K Science College,
या कादंबरीत टप्प्या-टप्प्यावर आंबीच्या नशिबात लिहिलेला संघर्ष लेखक विश्वास पाटील यांनी अतिशय ओघवत्यारित्या शब्दबद्ध केला आहे. या कादंबरीचा बाज हा ग्रामीण असल्याने ओघानेच यात ग्रामीण भाषा लेखनाने वापरली आहे. परंतु, वाचताना कायम लिखाणातील भाषा ही प्रत्येक वाचकाला खिळवून ठेवले. अगदीच काही पश्चिम महाराष्ट्रातील अस्सल शब्दांचा वापर केला आहे. त्याचा अर्थ त्याच पानावर दिल्याने वाचनात कुठेच खंड पडत नाही. कथेतील प्रत्येक पात्राला योग्य न्याय लेखणीतून दिलेला दिसतो. प्रत्येक पात्राची खंबीर भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे असे प्रकर्षाने जाणवते. कुठेही जा स्त्रियांच्या नशिबात संघर्ष लिहिलेला आहेच. घरंदाज, सुशील आंबूताईचा असा कोणता गुन्हा होता की, तिला आपल्या ऐन तारुण्यात दुःखाच्या वाळवंटाला सामोरं जावं लागलं. आंबी सारख्या जिच्या मागे सारी दुनिया वेडी होते, इतक्या रूपवान, सुंदर मुलीलाही काही संघर्ष टळला नाही. काही प्रसंग वाचतांना असे वाटते की सौंदर्य हा शाप आहे की काय… अशा वेळी डोळ्यात नकळत पाणी केव्हा उभे राहते कळत देखील नाही. कादंबरीचे बलस्थान है की लेखकाने लहानपणापासून पाहिलेल्या स्त्रियांच्या समस्या, संघर्षाची कहाणी एका कथेत सहजरीत्या बांधणे, ऐन तारुण्यात दुःखाच्या वाळवंटाला सामोरे जात त्यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या या शापित मोहिनीची ही वेधक व विचारप्रवर्तक संघर्षपूर्ण कहाणी आवर्जून वाचावी आणि समाजातील प्रत्येकानेच बोध घ्यावा अशी आहे… त्यामुळे अवश्य ही कादबरी वाचायला हवी.