भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा राघवेंद्र जोशी यांचे हे आत्मचरित्र आहे. राघवेंद्र जोशी यांचे हे आत्मचरित्र असले तरी पंडित भीमसेन जोशींचे चरित्र म्हणावे असे हे पुस्तक आहे. पंडित भीमसेन जोशी यांचीही कारकीर्द आपल्याला यातून वाचावयास मिळते.
राघवेंद्र जोशी यांना आपल्या पित्याच्या महानतेची पूर्णतः कल्पना होती. भारतरत्न पित्याच्या पोटी जन्माला येऊन देखील पुस्तकात वर्णन केलेली राघवेंद्र जोशी आणि त्यांच्या आईच्या वाट्याला आलेली उपेक्षा आणि अवहेलना सहन करूनही पुस्तकात कुठेही भीमसेन जोशींबद्दल तक्रारीचा सूर जाणवत नाही. अतिशय तटस्थपणे आणि स्वतःच्या आयुष्याकडे दुरून पहात राघवेंद्र जोशींनी हे आत्मकथन लिहिले आहे.पंडित भीमसेन जोशींनी केलेले दुसरे लग्न आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, राघवेंद्र जोशी आणि त्यांचे दोन भाऊ व त्यांची आई यांच्यावर या लग्नामुळे झालेला परिणाम आणि कुटुंबाची वाताहत आणि त्यातून सावरण्याची धडपड यातून कथन केली आहे. पंडित भीमसेन जोशी यांची संगीत क्षेत्रातील तपस्या आणि त्यांचा रियाज,त्यांना मिळालेले पुरस्कार याच बरोबर स्वतःची नोकरी व त्यांचे पाणी शोधण्याच्या क्षेत्रातील कर्तृत्व आणि बोअरवेल कंपनी याबद्दल देखील विस्तृतपणे लिहिलेले आहे. पंडित भीमसेन जोशी आणि राघवेंद्र जोशी यांच्या बापलेकाच्या नात्याबद्दल तरलपणे लिहिलेले प्रसंग अतिशय हृद्य आहेत.