पुस्तकाचे नाव:- छावा लेखकाचे नाव:- शिवाजी सावंत.
शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते मराठी कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांचे मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत यांना ‘मृत्युंजयकार’ सावंत म्हणून ओळखले जाते. शिवाजी सावंत यांना ‘छावा’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ पुरस्कार दिले आहे. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. छावा ही छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जीवन पटावर लिहिलेली कादंबरी आहे. ‘संभाजी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव १४ मे इसवी सन १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मले. संभाजी राजे, शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी ‘सईबाई’ यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्यचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवन काल अतिशय कठीण होता. ते जन्मापासूनच बिकट परिस्थितीत अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितीशी सामना करत संभाजी राजे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले. जन्मताच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई ‘धाराऊ’ थोरल्या महासाहेब ‘जिजाबाई’ व सावत्र आई ‘सोयराबाई’ यांच्यात आई शोधू लागले. राजकारणातील बारकावे त्यांनी लवकर आत्मसात केले. लहान वयातच अशा काही घटना घडल्या की, ज्यामुळे त्यांना मोगलांकडे राहावे लागले. वयाच्या अवघ्या नव्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला. इसवी सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. राज्याभिषेक नंतर अवघ्या बारा दिवसात झालेल्या जिजाबाईंच्या निधनानंतर संभाजी राजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत राज्यातील कामात गुंतलेले असतात. संभाजी राजांचे महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्याशी अनेकदा मतभेद होऊ लागले. मानकरी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. ‘अण्णाजी दत्तो’ महाराजांचे अमात्य अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड ,भ्रष्टाचारी त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांसोबत दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच त्यांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळांनी नकार दिला. दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याची सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला. पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकर यांनी संभाजी राजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. शंभूराजांच्या ताईसाहेब ‘राणुबाई’ त्यांच्या सोबत सावली सारख्या होत्या. एप्रिल १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावरील मायेचा शेवटचा हातही नियतीने काढून घेतला. या युग पुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाई कडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर मी स्तब्ध झाले. त्यानंतर संभाजी राजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. सर्व सुख-दुःखाच्या प्रसंगी संभाजीराजांच्या पत्नी ‘येसूबाईंनी’ दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या कादंबरीत केले आहे. संभाजी राजांच्या दुर्दैवाने सख्ये मेहुणे गणोजी शिर्के काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले. औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने केलेल्या संगमेश्वराच्य हल्ल्यात संभाजीराजे आपले प्रिय मित्र कवी कलश सोबत पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. या कादंबरीतील शेवटची वीस पान वाचताना मनात संताप आणि डोळ्यात अश्रू येतात. त्यांची निर्घृण हत्या मार्च ११ इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदी जवळच्या ‘तुळापूर’ येथे करण्यात आली. एवढा त्रास सहन करूनही ते औरंगजेबासमोर झुकले नाहीत आणि यातच औरंगजेबाचा पराभव सिद्ध झाला. ही कादंबरी खूपच छान आहे. हिची पृष्ठ संख्या ८५३ इतकी आहे. मुखपृष्ठावर छत्रपती संभाजी महाराजांचे मनमोहक चित्र आहे. त्यावरूनच ते कसे असतील हे समजते. मला ही कादंबरी खूप आवडली. भाषाशैली उत्कृष्ट आहे सर्वसामान्यांच्या मनावर प्रभाव पाडणारी कादंबरी आहे. या कादंबरीची किंमत १६५ असून सर्वसामान्यांना परवडणारी आहे. कादंबरी हाताळण्यास योग्य आहे.
कु. निकीता ज्ञानेश्वर भगत.
एफ.वाय.बी.ए.