महाबुद्ध डॉ. आंबेडकर या पुस्तिकेत लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाबुद्ध कसे आहेत हे स्पष्ट केले केले आहे. ते लिहितात, “बोधी म्हणजे ज्ञान .ज्याला बोधी प्राप्त झाली तो बुद्ध. याचा अर्थ ज्ञानी होणे म्हणजे बुद्ध होणे. ज्ञानी होण्याचे तीन अर्थ आहेत. इतरांनी निर्माण केलेले आणि अवतीभोवती विद्यमान असलेलेस ज्ञान आपलेसे करणे म्हणजे ज्ञानी होणेच होय. ज्ञानी असण्याचा हा पहिला प्रकार झाला. असे ज्ञान मिळविण्याने माणूस उपलब्ध ज्ञानाची माहिती करून घेतो. ज्ञानाच्या क्षेत्रात परस्परविरोधी मतप्रवाह असतात. काही लोक या वेगवेगळ्या मतप्रवाहांची माहिती निष्ठापूर्वक आपलीशी करतात. अशा विपुल माहितीचा साठा करणे महत्त्वाचे असतेच. असा ज्ञान संग्रह असणारी व्यक्ती उपलब्ध ज्ञानाची संग्रहक या अर्थाने ज्ञानी असते. दुसऱ्या प्रकारच्या काही व्यक्ती उपलब्ध ज्ञानाची वर्गीय मांडणी करतात. उपलब्ध ज्ञानाचे दोन छावण्यांमध्ये व्यवस्थापन करतात. आणि त्यातील एका छावणीची भूमिका प्रमाण मानतात. माहिती मिळविणे या पहिल्या पातळीवरच्या प्रक्रियेपेक्षा भूमिका घेणे ही पुढची पायरी असते. इथे ज्ञानाच्या तपासणीचा, चिकित्सेचा प्रारंभ होतो. येथे खरे म्हणजे ज्ञानमीमांसा सुरू होते. ज्ञानक्षेत्रातील अनिष्ट नाकारण्याला आणि ईस्ट नाकारण्याला महत्त्व प्राप्त होते. तर्कप्रामाण्य आणि शब्द शब्द प्रमाणे अशा निष्ठांच्या दोन वाटा निर्माण होतात. ज्ञानाच्या उपकारकतेचे आणि विधायकतेचे मुद्दे पुढे येतात. मग इथे ही किंवा ती भूमिका अंगीकारली जाते. ज्ञानक्षेत्रात अशा व्यक्तींमुळे संघर्षाला प्रारंभ होतो. तत्त्वज्ञानातील वैचारिक युद्ध सुरू होते. हे व्हावे लागते. हेही खरे. तेही खरे. या बाळबोध अवस्थेतून मानवी मन बाहेर यावे लागते. प्रमाणकांची, प्रमाणमूल्यांची लढाई सुरू व्हावी लागते. या प्रक्रियेतच ज्ञानाला नवी पालवी येत जाते. तसूतसू का होईना का होईना ज्ञान पुढे सरकत जाते. ज्ञानाच्या विकासाची दारे उघडली जातात. ज्ञानी होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार याहून वेगळाच असतो. आदर्श माणूस कसा असावा? आदर्श समाज कसा असावा ? आणि आदर्श मानवी दुनिया कशी असावी ?यासंबंधीचे एखादे नवे आणि विधायक स्पष्टीकरण, दुनियेच्या तोवरच्या ज्ञानाला दुरुस्त करणारे आणि ज्ञानाची महता वाढवणारे, ज्ञान पुढे नेणारे एखादे सम्यक स्पष्टीकरण एखाद्या प्रज्ञावंताला सुचते तेव्हा हा ज्ञानवंत मागल्या ज्ञानी माणसापेक्षा वेगळा ठरतो”.
पहिले दोन प्रकारचे लोक ज्ञानाचे उपासक असतात. ज्ञानाचे पाईक असतात. पुरस्कर्ते असतात. ज्ञान जन्माला घालणाऱ्या अशा लोकांना ज्ञानी म्हटले जाते. ज्ञानवंत म्हटले जाते. असे ज्ञान ज्यांना जन्माला घालता येते ती माणसे मानवी समाजात कमीच असतात. बुद्ध अशा थोड्या ज्ञानवंतापैकी एक आदरणीय ज्ञानवंत होता. त्याला बोधी प्राप्त झाली होती. नव्या ज्ञानाचा सोन्याचा हंडा त्याच्या हाती लागला होता. बुद्ध माणूसच होता. तो माणसांमधलाच एक महान बुद्धिमान माणूस होता. तो बुद्धिवादी होता. सगळ्या दुनियेच्या दुःखांनी व्याकुळ होणारा करुनेचा सागर तो होता. बुद्धीला पटले नाही ते त्याने प्रमाण मानले नाही. त्याने फक्त माणसांच्या हिताच्या कृती प्रमाण मानल्या. त्याने केवळ माणसाच्या ऐहिक जीवनाच्या हितासाठी शब्द वापरले. माणसाला गुंगवणाऱ्या, माणसाला फसवणाऱ्या आणि माणसाच्या उज्वलतेच्या आणि समतेच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या ईश्वर, आत्मा, परलोक अशा सर्व गोष्टी त्यांनी मानवी मनातूनच काढून टाकण्याचा कार्यक्रम राबवला. बुद्ध माणूसच होता. त्याला कोणी ईश्वरही म्हणू नये. भगवानही म्हणू नये. महात्माही म्हणू नये. तो कोणाचा अवतार आहे हे सांगून लोकांना फसवू नये आणि त्याने कोणता अवतार घेतला हे सांगून मानवी बुद्धीचा आणि बुद्धीवादी बुद्धाचा अवमान करू नये.
बोधिसत्व म्हणजे ज्ञानी नव्हे. ज्ञानी होण्यासाठी जो प्रयत्न करतो आहे तो बोधिसत्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला कोणकोणत्या अवस्थांमधून जावे लागते यासंबंधी लिहिले आहे. दहाव्या अवस्थेनंतर बोधिसत्व बुद्ध होतो. ही 10 लक्षणे ज्ञानी होण्याची आणि अर्थात जीवन मुक्त होण्याची लक्षणे आहेत . आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या दहाही अवस्था पार केल्याने त्यांना बोधिसत्व म्हणणे हा केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाच नव्हे तर ज्ञानमीमांसेचाच अवमान ठरेल. सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त झाली आणि सिद्धार्थ बुद्ध झाला. ही ज्ञान प्राप्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती अजिबात नव्हे. कोणाची आध्यात्मिक सिद्धीही ती अजिबात नव्हे. बुद्धाला झालेली ज्ञान प्राप्ती ही कुणा परमेश्वरासंबंधी नव्हे. बुद्धाला झालेल्या ज्ञान प्राप्तीचा पर लोकाशी , परमार्थाशी, अध्यात्माशी, मोक्षाशी, परमेश्वर प्राप्तीची वा आत्मज्ञानाचशी काहीही संबंध नाही. अशा कोणत्या ज्ञानप्राप्तीसाठी बुद्धाचा आटापिटा नव्हता. स्वार्थ, लोभ, असूया, अहंकार अशा गोष्टींमुळे माणसाच्या जीवनात अनेक युद्ध जन्माला आली. नाना प्रकारच्या विषमता आणि शोषण जन्माला आले. इथे मग इतरांना दुःखात लोटणारे दुःखी झाले आणि दुःखात लोटले गेलेलेही दुःखी झाले. दुनिया अशी दुःखालय झाली. तृष्णेच्या भीषण आगीत जळणारे अरण्य ती झाली. मानवनिर्मित दुःखाच्या, समस्येचे सम्यक स्पष्टीकरण ज्या क्षणी सिद्धार्थाला गवसले, त्याक्षणी सिद्धार्थ बुद्ध झाला. सिद्धार्थ ज्ञानी झाला. बुद्ध महाज्ञानी झाला. महाबुद्ध झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ज्ञानवंतांना ज्ञानी करणारे ज्ञान निर्माण केले. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर ज्ञानीच केवळ आहेत असे नाही तर ते महाज्ञानी आहेत असेच म्हणावे म्हणायला हवे. म्हणजे खुद महाज्ञानी या अर्थाने बुद्धाला महाबुद्ध म्हणायला हवे. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही बुद्ध म्हणायला हवे.असे सुंदर व प्रभावी स्पष्टीकरण या पुस्तिकेत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या पुढल्या सर्व शतकांचे ‘महाबुद्ध’ आहेत ही गोष्ट डॉ. यशवंत मनोहरांनी या पुस्तिकेत सांगितली आहे.