केशव सीताराम ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. या विचार प्रणालींच्या प्रसारासाठी त्यांनी “प्रबोधन” हे नियतकालिक अनेक वर्ष प्रकाशित आणि संपादित केले. त्यांची लेखनशैली ही अतिशय कडक आणि भडक होती. त्यामुळे “प्रबोधन” त्या काळी खूप गाजले, त्यामुळेच त्यांना “प्रबोधनकार” ही पदवी मिळाली.
सामाजपरीवर्तनाचा ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तिमत्व किती मनस्वी, बहुरंगी आणि जिद्दीचे होते याचा प्रत्यय या त्यांच्या आत्मचरित्रातून येतो. प्रबोधनकार यांचे वाचन तर आफटच होते परंतु त्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवामुळेच ते सत्यशोधक मतांकडे वळले. आर्थिक विवंचना असूनही आपली लेखणी द्रव्यासाठी आणि सन्मानासाठी कोणाच्या स्वाधीन केली नाही. एकदा शाहू महाराजांनी अकारण किंवा मेहेरबानी म्हणून देऊ केलेली पाच हजारांची रक्कम त्या काळात एका इस्टेटीसारखी चार कडक शब्दासह त्यांनी तिथल्या तिथे परत केली, यावरून त्यांची सत्यशोधक वृत्ती जाणवते.
प्रबोधनकार म्हणजे एक बहुरंगी, बहुढंगी, बहुरूपी कर्तुत्ववान पुरुष, छायाचित्रकार, तैल चित्रकार,पत्रपंडित, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, टंकलेखक, समाजसुधारक, बहुजनांचे कैवारी, वक्ते, नेते, पटकथा संवाद लेखक, चरित्रकार नि इतिहासलेखक या विविध भूमिका त्यांनी पार पडल्या.
प्रबोधनकाराची जीवनगाथा ही प्रसंगोपात सहज स्फुरलेली विविध प्रकारच्या आठवणीना एकत्र गुंफून तयार केलेली आहे. ती एक आटोपशीर कलाकृती असली तरी तिची मांडणी काही स्थळी, कालानुक्रमाच्या अभावी जितकी सुसंगत, बांधीव व प्रमाणबद्ध व्हावयास पाहिजे तितकी होऊ शकली नाही. त्याचे कारण म्हणजे आत्मचरित्र लिहावे असे त्यांना वाटतही नव्हते व तशी त्यांची इच्छाही नव्हती.
आपली जीवनगाथा यामध्ये प्रबोधनकार सांगतात जीवन हे एक सूत्र आहे ते म्हणजे “जन्मप्राप्त आणि कर्मप्राप्त व्यवहाराच्या रंगभूमीवर पडेल ती भूमिका उत्तम उठविण्याची धडपड करणारा एक धडपड्या नाटक्या” हे होय. याचे एक वैशिष्टय म्हणजे त्यांच्या जीवनाशी ज्या ज्या व्यक्तींचा सबंध आला, ज्या ज्या घटना, इतिहास त्यांनी पहिला त्यांच्याशी संबध आला त्यांचे त्यांनी कथन व चित्रण मनमोकळेपणाने व कर्तव्य भावनेने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतीरिवाज, ग्रामीण जीवन ह्यांच्या स्थित्यंतराची रसभरीत व मनवेधक दृश्ये रेखाटली आहेत. त्यात काही जनतेच्या कैवाऱ्यांची, अज्ञात, सच्च्या व त्यागी अशा अनेक समाजसेवकांची, नाट्य कला व काव्य या क्षेत्रातील महानुभावांची, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कर्मयोग्यांची ह्रदयंगम शब्दचित्रे व व्यक्तिचित्रे घडविली आहेत. त्यावरून आपल्या कालखंडाचे प्रबोधनकार कसे डोळस साक्षी आहेत हे मनावर ठसते. ‘कालमानाप्रमाणे आपल्या आचारविचारात झटपट बदल करण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बामनांच्या नव्या पिढीत आहे ’असे त्यांना वाटत होते.
मराठी माणसाच्या जीवनात, आचारविचारात, खाण्यापिण्यात व राहणीत आरपार बदल झालेला पहावयास मिळतो. जुन्या काळी पायात जोडा किंवा चप्पल घालून रस्त्याने जाण्याची हिम्मत महिलांची होत नव्हती. रखेल्यांची रूढी प्रतिष्ठीत गणली जाई. नाटकात काम करणाऱ्या महिलांना तिरस्काराने ‘रांडा’ म्हणत. तर आता नटीना गौरवाने ‘देवी’ म्हणत. शेंडीचे घेरे छाटून चेहरे राखू लागल्याचे दिसते. एकत्र कुटुंब पद्धतीचे तीन तेरा होऊ लागले. ग्रामोफोनने गायकीत क्रांती केली. ‘पुण्याच्या टिळकाने गणपती दैवत चव्हाट्यावर आणून ठेवले’ म्हणून प्लेग झाला. ही अज्ञानी समजूत ठाण मांडून बसली होती. हुंडा पद्धतीने अनर्थ उडविला होता. जरठ-बाला विवाहांनी कहर उडविला होता. यांची माहिती व कहाणी या जीवनगाथेत भरपूर आहे.
प्रबोधनकाराची तळमळ एवढी प्रचंड होती कि त्यांनी आपल्या स्वाध्यायाच्या व अभ्यासाच्या जोरावर मिळविलेले ज्ञान विश्वविद्यालायची डॉक्टरेट संपादन केलेल्या दोन चार पंडितांच्या व्यासंगाएवढे अफाट होते. ‘आपल्या मासिक वेतनातील मोठा भाग त्यांनी ग्रंथ विकत घेण्याच्या छंदात उधळला’. यांच्या पगाराच्या दिवशी त्यांच्या आजीच्या पोटात गोळा यायचा कारण हा आत्ता पुस्तकाच्या दुकानात जाऊन बेहोष होईल आणि पगाराची पुरी वाट लावीन. प्रबोधनकार यांना वकील व्हायचे होते परंतु ते त्यांना होता आले नाही. माणसाने एकमार्गी नसावे, अंगात हरहुन्नर पाहिजे, पडेल ते काम अंगमेहनतीने पार पडण्याची शहामत पाहिजे असे त्यांना वाटत असे.
ह्या जीवनगाथेतील राजर्षी शाहू छत्रपती यांचे नेतृत्व नि व्यक्तिमत्व, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य, कृष्णराव गोरे यांच्या गाण्याच्या तबकड्या, ब्राम्हणेतर चळवळीवर झालेला परिणाम, डॉ.दत्तात्रय कृष्ण कोल्हटकर यांच्या मुलीचा अमेरिकेतील पुनर्जन्म, नाथमाधवांचा आजारीपणा व लेखन, गांधीजींच्या दोन गाठीभेटी, फैजपूर कॉंग्रेस यांची वर्णने मुळातच वाचावी. ‘सत्यनारायणाची पूजा’, ‘व्यंकटेशस्तोत्र’, ‘शनिमहात्म्य’ आणि महाराष्ट्रीय संतांचे कार्य यांविषयी त्यांची मते वाचनीय आहेत.
प्रबोधनकार यांच्या आत्मवृतात त्यांचे सहानुभूती गुणग्राहकता, निर्भयता नि संयमाचे चांगले दर्शन घडते. ते स्वत: कलावंत, रसिक, रगेल नि रंगेल असल्यामुळे जीवनगाथेच्या लेखनात आकर्षक रंग व रेषा भरल्या आहेत. त्यात कृत्रिमता नाही. शैली नि कलाकृती एकरूप झालेली आहेत. नाटक कंपण्याबरोबर नि व्याख्यानासाठी केलेल्या भ्रमंतीत ज्या बोली एकल्या त्यांचाही परिणाम झालेला आहे असे वाटते. ती उपहास करते तरी विखारी नाही. ती आहे ढंगदार नि वीरश्रीयुक्त.