पुस्तक परीक्षण अंकिता सपार तृतीय वर्ष वाणिज्य एम.जी.ई.एस. श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय पुणे
शिवाजी सावंत यांची आणखी एक अप्रतिम कादंबरी. युगंधर हि कादंबरी मी वाचायला सुरवात केली तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा व माझ्या मनाचा संवाद सुरु झाला. या कादंबरी वैशिष्ट म्हणजे वाचत असताना श्रीकृष्ण देव, परमात्मा, भगवान असा कोणी दुरचा राहत नाही. तो कधी आपला मित्र, सखा, सोबती होऊन जातो हे कळत देखील नाही.
मृत्युंजय व युगंधर आकृतिबंध सारखाच आहे. श्रीकृष्ण, रुक्मिणी, द्रौपदी, दारूक, अर्जुन, सात्यकी,उद्धव या पात्रांच्या साहाय्याने त्यांनी साक्षात श्रीकृष्ण प्रकट केला आहे. श्रीकृष्णाला देव मानून पूजा करणे किंवा त्याच्यावर टीका करून मोकळा होणे या दोन्ही गोष्टी सोप्या आहेत पण श्रीकृष्णाला समजून घेणे खूप अवघड आहे…… तो विष्णूचा अवतार आहे, देव आहे हे एका पायावर आपण मान्य करतो पण तो शेकडो वर्ष सांगत राहिला- ” मी अंशरूपाने तुम्हा प्रत्येकात नांदतो आहे.” ते मानायला मात्र आपण तयार होत नाही. खरंच जर आयुष्य समजून घ्यायचा असेल तर श्रीकृष्णाचं तत्वज्ञान समजून घेणं अनिवार्य आहे.
या पुस्तकामध्ये श्रीकृष्णाचे अंतरंग शिवाजी सावंतांनी उलगडले आहे. त्याचे दिव्य स्वरूप तितक्याच दिव्य भाषेत त्यांनी मांडले आहे. तो चक्रवर्ती सम्राट जितका भव्य-दिव्य तितकाच आपला खूप जवळचा वाटतो.
अर्थात यामध्ये शिवाजी सावंतांचे भाषाप्रभुत्व व वाचकांना खिळवून ठेवण्याची हातोटी मानावीच लागेल. मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हापासून या पुस्तकाच्या प्रेमात आहे. हजारो वर्षांपासून भारतीय मन व्यापून उरलेल्या या युगंधराला जाणून घेणं हा एक प्रवास आहे. खरंच शिवाजी सावंत सरांनी हे पुस्तक लिहून आपल्या सिद्धहस्त लेखणीची जाणीव करून दिली आहे. या कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे……!