कोणी एकेकाळी लोकमान्य टिळकांच्या रुपाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वैचारिक नेतृत्व करण्याचे काम पुणे शहराने केले. पुणे शहराला बराच प्राचीन इतिहास असून काही घटनांचा उल्लेख केल्याशिवाय पुणे शहराचा इतिहास पूर्ण होत नाही. 1976 साली झालेले जोशी-अभ्यंकर हत्याकांड ही देखील पुण्याच्या इतिहासातील अशीच उल्लेखनीय घटना आहे.
गुन्हेगार गुन्हा करायला कसा प्रवृत्त होतो, त्यामागे त्याची काय मानसिकता असते, कशाप्रकारे गुन्ह्याची तयारी केली जाते, किंवा गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार नेमके काय करतात या सगळ्या गोष्टींचा आता बराच अभ्यास केलेला आढळतो. परंतु 1976 साली पुण्यात झालेले जोशी अभ्यंकर हत्याकांडाने पुण्याचा चेहरा मोहराच बदलला आणि प्रचंड दहशत निर्माण केली. या हत्याकांडानंतर तुळशीबाग आणि मध्यवर्ती पुण्यातील अनेक पेठा सायंकाळी सात नंतर ओस पडायच्या. गुन्हेगारांनी वापरलेली हत्यारे जसे की नायलॉनचे दोर आणि पोलिसांच्या श्वानाला ठावठिकाणाही लागू नये म्हणून गुन्ह्याच्या ठिकाणी केलेला अत्तराचा वापर या दोन गोष्टींमुळे या हत्याकांडामधील गुन्हेगारांपर्यंत पोलिसांना पोहोचायला बराच वेळ लागला. या हत्याकांडामधील अटक केलेल्या गुन्हेगारांपैकी एक मुनव्वर शाह याचे हे आत्मकथन आहे.
सर्वसामान्य घरातला, कॉलेजमध्ये जाणारा मुलगा जर त्याची संगत वाईट असेल तर आयुष्य वाममार्गाला लागून त्याचा शेवट किती भयानक प्रकारे होऊ शकतो याचे हे पुस्तक आणि ही घटना उत्तम उदाहरण आहे.
मुनवर शाह याने त्याचे बालपण, त्या काळातील पुणे येथील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती, बदलत चाललेले जीवनमान, लागलेली वाईट संगत आणि गुन्हा करत असताना देखील शाबूत असलेली सद्सदविवेकबुद्धी परंतु मित्रांच्या आग्रहाखातर तरी देखील गुन्ह्यात घेतलेला सक्रिय सहभाग या सर्व गोष्टींचे अतिशय विस्तृतपणे वर्णन केलेले आहे.
खुनाची वर्णने वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. अजूनही जुन्या लोकांच्या तोंडून या घटनांची वर्णने आणि त्या काळातील पुण्याची झालेली परिस्थिती ऐकताना घटनेचे गांभीर्य लक्षात येते.
वाईट संगतीचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे मुनव्वर शाह याचे आत्मकथन आहे आणि या पुस्तकामुळे सुसंगतीचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित होते.