Share

प्रा. डॉ. विद्या कुलकर्णी मराठी विभाग प्रमुख पुणे विद्यार्थी गृह श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य, विज्ञान व कला महाविद्यालय, नाशिक
डॉ. पी. विठ्ठल हे आजच्या काळातले महत्त्वाचे कवी आणि समीक्षक आहेत. ‘विश्लेषण’ हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह नूकताच प्रसिद्ध झाला आहे. एखाद्या लेखकाने अभ्यासलेल्या साहित्यकृती, विचारधारा आणि समकालीन वाङमयीन, सांस्कृतिक प्रश्नांवर आस्थेने लेखन करावे, ही गोष्ट सांस्कृतिकदृष्ट्या अधिक महत्त्वाची असते. पी. विठ्ठल यांची मुख्य ओळख कवी म्हणून असली तरी साहित्याभ्यासक म्हणूनही त्यांना मोठी मान्यता आहे. लेखक म्हणून समकाळातील विविध घटना घडामोडींकडे संवेदनशीलतेने पाहताना आलेल्या अनुभवांचे ‘ विश्लेषण’ या पुस्तकात आलेले आहे. या समग्र लेखनात त्यांची विशिष्ट भूमिका दिसून येते.
पहिल्या भागात ‘लेखकाचे राजकीय आणि सामाजिक भान’, ‘लेखकाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक दबाव’, ‘अभिरुचीचे स्वरूप बदलते स्तर’ या महत्त्वाच्या लेखांसह वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला’ या वादग्रस्त ठरलेल्या कवितेच्या संदर्भात त्यांनी मुद्देसूद भाष्य केले आहे. ‘लेखकाच्या लेखननिष्ठा मानवी जगण्याशी आणि जीवनमूल्यांशी एकनिष्ठ असायला हव्यात’ ही त्यांची भूमिका सर्वमान्य होण्यासारखी आहे. ‘विश्लेषण’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकाल’, ‘बुद्ध तत्वज्ञान : काळाची अनिवार्य गरज’, ‘गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय’, ‘अण्णा भाऊ साठे यांचे भाषण : समकाळाच्या पार्श्वभूमीवर आकलन’ आणि ‘मूकनायकची शताब्दी आणि समकाल’ हे लेख समाविष्ट आहेत. प्रत्येक लेखात त्यांचा स्वतंत्र दृष्टिकोन प्रत्ययास येतो. तिसऱ्या भागात ‘निकोप आणि समाजभिमुख लेखनाची गरज’ सद्य: स्थितीत का आवश्यक आहे? आणि ‘समाजजीवनाची पृष्ठभूमी लेखकाला समजून घेता आली पाहिजे’ हे विचार त्यांनी मांडले आहेत. तर चौथ्या विभागात ‘टिळकांचे अग्रलेख’, ‘साने गुरुजी यांच्या संदर्भात’, ‘कथाकार ग. दि. माडगूळकर’, ‘गो. वि. करंदीकरांनी केलेल्या भाषांतरांची मराठी समीक्षेने घेतलेली दखल’ यासारख्या लेखांतून उपरोक्त लेखकांच्या लेखनाची भूमिका, मराठी साहित्य व समीक्षा दालनात त्यावर चर्चिली गेलेली मते, समीक्षकांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष यासारख्या बाबींची अभ्यासपूर्ण चर्चा झालेली आहे. यासाठी त्यांनी दिलेले संदर्भ अभ्यासकांसाठी महत्त्वाचे वाटतात. कथावाङमयात माडगूळकर यांची फारसी चर्चा झालेली नाही, याकडे वाचकांचे लक्ष ते वेधतात. लेखकाची अभ्यासपूर्ण मांडणी हे या लेखांचे वैशिष्ट्य ठरते.
पाचव्या आणि सहाव्या विभागात अनुक्रमे पाच आणि दोन लेख आहेत. प्रत्येक लेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘तुकारामाची काठी’ या पहिल्या लेखात पुरुषोत्तम पाटील यांच्या ललित लेखनाची चर्चा केलेली आहे. मराठी कवितेच्या क्षेत्रात दर्जेदार काव्यलेखन करणारे कवी पुरुषोत्तम पाटील यांच्या ‘कविता-रती’ या मासिकाबाबतची भूमिकाही या लेखात पी. विठ्ठल यांनी मांडली आहे. ‘पेरुगन मुरुगन : समकाळातल्या सार्वत्रिक उद्वेगाची गोष्ट’, ‘मराठे इंग्रज : शतकापूर्वीची सम्यक समीक्षा’ हे लेखही वाचनीय आहेत. सहाव्या विभागात ‘मराठीतील वाड्मयीन चळवळी’ आणि ‘पुस्तकाचं वाचन : भावनेची पुनर्बांधणी करतं’ हे दोन लेख आहेत.
एकंदरीत ‘विश्लेषण’ हे पी. विठ्ठल यांचे पुस्तक वाचकांना व अभ्यासकांना बौद्धिक मेजवानी ठरेल असे मला वाटते. पुस्तकातील लेख प्रसंगपरत्वे लिहिलेले असले तरी विचारांतील सस्पष्टता आणि सुसूत्रता लक्षात घेण्यासारखी आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना साहित्याची नवीदृष्टी देण्याचे कार्य हे पुस्तक करील, असे मला वाटते.

Recommended Posts

The Undying Light

Kavita Murtadak
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Kavita Murtadak
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More