नाव :- पार्थ प्रताप खाडिलकर, (एम. ए. द्वितीय वर्ष मराठी विभाग)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ .
व्यंकटेश माडगूळकर यांचा मराठी सारस्वतांतील वाङ्मय पैस फार मोठा आणि विशिष्ट असा आहे. खरे तर मराठी साहित्यात ह. ना. आपटेंपासून सुरू झालेल्या लघुकथेला अस्सल मराठी मातीत रंगवले ते माडगूळकरांनी. मराठीतल्या साहित्याचा प्रथम पासून विचार करता व्यंकटेश माडगूळकरांचे हे वेगळेपण अभ्यासकाच्या चटकन लक्षात येते. पिंजऱ्यातला वाघ कसा दिसतो याचे चित्रण दुरुस्तपणाने करणे आणि प्रत्यक्ष जंगलात फिरून वाघाचे अस्सल चित्रण करणे यात जो फरक आहे तोच माडगूळकर पूर्वकालीन लेखक आणि स्वतः माडगूळकर यांच्यात आहे. मराठी साहित्य विश्वात त्यांनी स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केलीच पण त्या वेगळ्या वाटेवर तितकीच आशयघनताही आणली. प्रस्तुत लेखात व्यंकटेश माडगूळकरांच्या सत्तांतर या कादंबरीचे परीक्षण केले आहे त्यामुळे केवळ आणि केवळ सत्तांतर हेच प्रतिपाद्य असले पाहिजे पण साहित्य कृती हाताळण्याआधी लेखकाच्या लेखनाची नस माहिती असावी म्हणून थोडीशी प्रस्तावना केली आहे.
सत्तांतर कादंबरीतील कथानक आणि पात्र चित्रणाचा विचार करताना पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की ही कथा कुठल्याही मानवी समुदायात घडत नसून ती जंगलातील वानरांच्या टोळीत घडते. रूढार्थाने याला प्राणीकथा असेही आपण म्हणू शकत नाही कारण यावर मानवी भावनांचे आरोपण स्पष्टपणे जाणवते. कथानक हे कथनात्मक साहित्याचा गाभा असते त्यामुळे कथानक निर्मितीत लेखकाने आपले स्वत्व आणि सत्व दोन्हीही ओतलेले असते. सत्तांतराचेही असेच आहे. वानरांच्या दोन टोळ्यांमधील सत्ता स्पर्धेतून घडलेल्या विविध प्रसंगांचा आधार घेत कथा पुढे सरकते. एक प्रबल असलेली वानरांची टोळी आपली सत्ता टिकवून असते पण त्याच वेळी तिच्यावर सत्ता संपादन करण्यासाठी आजूबाजूचे पेंढारीही तितकेच आसक्त असतात. कधी या वानरांच्या टोळीतील मुख्य वरचढ ठरतो तर कधी घुसखोर. माणसांमध्ये जशी सत्ता स्पर्धा चालते, उच्च निचत्वाच्या भावनेतून जशी चढाओढ चालते तशीच ती प्राणी जगतातही सुरू असते. किंबहुना सत्ता स्पर्धा ही समग्र सजीव विश्वाच्या दैनंदिन जगण्यातील एक अविभाज्य घटक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सत्तांतर कादंबरीत पात्रांमधील संवाद नाहीत. कारण मुळात इथे बोलणारी पात्रेच नाहीत. वानरांनी एकमेकांना इशारे देण्यासाठी काढलेले आवाज, त्यांच्या हालचाली, संकटकाळातील त्यांचे नियोजन, रहिवास आणि आजूबाजूच्या निसर्गाचे प्रत्ययकारी चित्रण यातून कथा प्रवाहित राहते. माडगूळकरांनी वानरांच्या टोळीतील वेगवेगळ्या वानरांना त्यांच्या गुणानुरूप, व्यंगानुरूप नावे दिली आहेत. उदा., मुडा, लालबुड्या, तरणी, थोटी, बोथरी, मोगा इत्यादी. पण हे करत असताना प्रत्यक्ष माणसाच्या वागण्याचे आरोपण ते या पात्रांवर करू इच्छित नाहीत. लेखकाला ही प्राणिकथा म्हणून वाचकांसमोर आणायची नव्हती तशी या कथेला रूपक कथा म्हणूनही आकारायचे नव्हते. खरे तर संवादाशिवाय सर्व निवेदन असण्यामागेही कथेवर मानवी आरोपण नको हाच लेखकाचा हेतू आहे. सत्तांतर वाचताना माडगूळकरांच्या सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निरीक्षण शक्तीचा प्रत्यय वाचकाला येतो. त्यासाठी लेखकाने साधनाही खूप केली आहे. जंगलांमधील भटकंती, वानरांच्या स्वभावाचा अभ्यास, स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, वानरांमधील नर-मादी, वानरी व तिची पिल्ले, मुख्य नर व टोळीतील अन्य वानरी आणि पिलावळ या सगळ्यांचे अगदी वास्तव व खरेखुरे विश्व माडगूळकर अभ्यासांती आपल्यासमोर उभे करतात. प्रस्तुत कादंबरीत टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे अर्थात सत्तांतर घडणे हे ह्या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानराच्या ह्या कथेतून मानवी जगातील वृत्ति-प्रवृत्तींचाही प्रतीकात्मक पातळीवर सुजाण वाचकाला प्रत्यय येत राहतो, हे वर उद्धृत केलेलेच आहे.
कादंबरीतील काही वाक्य ही अगदी वास्तवदर्शी आणि परिणामकारक ठरतात.
“पोराला मरून चार दिवस झाले, तरी तिने त्याला टाकले नाही. घेऊनच हिंडत होती. पोर मेलं होतं, तिचं आईपण मरत नव्हतं.”(पृष्ठ ६१) ‘
“काळाप्रमाणेच संघर्ष ही सतत वाहतच असतो.त्याला खंड असा नसतोच…जेव्हा संघर्ष उचल खातो, तेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते…संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्स्त्रं माहीतच नसतात, ते सुळे,नखं वापरतात.. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो. (पृष्ठ ७०) कादंबरीचा शेवट हा ‘मोगा’ वानराच्या विजयाने तर ‘मुडा’वानराच्या पराजयाने होतो. कादंबरीतील हेच सत्तांतर माणसाच्या मनातील आकांक्षा, त्याची वर्चस्ववादाची भावना क्षणभर दाखवून जाते.
सत्तांतर मधील रेखाचित्रे स्वतः व्यंकटेश माडगूळकरांनी रेखाटली असून तीही विषयवस्तूशी परिणाम साधतात हे मुद्दाम सांगावयास हवे. कादंबरीचा आकार हा थोडका असला तरी तिच्यातील आशयघनता ही अंतर्मनाच्या पातळीवर विस्तारत, प्रसरण पावत जाते. किंबहुना कादंबरीचे सार म्हणून आपल्याला असे विधान करता येईल की, वानरांच्या टोळीतील सत्तासंघर्ष हे प्राणी जगतातील मनुष्य स्वभावाचे चित्रण आहे की काय इतके प्रत्ययकारी व वास्तव झाले आहे.