नाव: देशमुख रविशा मनोहर
(MLIS Ist year)
ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
प्रस्तावना:
या पुस्तकाचे नाव समकालीन मराठी कथा आहे. हे एक संपादकीय पुस्तक आहे. हे पुस्तक – डॉ.शिरीष लांडगे डॉ.दिलीप पवार, डॉ. संदीप सांगळे या लेखकांनी संपादित केले आहे. या पुस्तकात एकूण नऊ कथा आहेत. या कथांमध्ये प्रमुख बाब म्हणजे या कथेचा विस्तार त्यातील प्रमुख नायकाच्या भूमिकेशी व त्याच्या परिस्थितीविरुद्धच्या संघर्षासोबत आहे. या पुस्तकातील कथा नायिका व नायकाच्या अनुभवांशी निगडित आहे. पुस्तकाचे प्रकाशन जून २०१९ मध्ये झाले आहे. पुस्तकाचे ऐतिहासिक महत्व म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सर्वच महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राकरिता अभ्यासपुस्तक म्हणून समाविष्ट आहे. तसेच याचे सांस्कृतिक महत्व म्हणजे या सर्व कथा समकालीन कथा संग्रहातील जीवनानुभव प्रकट करणाऱ्या आहेत.
समकालीनतेच्या सूत्रातील कथांची सरमिसळ होऊ नये म्हणून दलित, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिम, ग्रामीण-शहरी, विनोदी अशा प्रवाहातील काही निवडक कथा निवडल्या आहेत. माझ्यावर या पुस्तकाची छाप असल्याचे कारण म्हणजे मी महाविदयालयात शिकत असताना हे पुस्तक माझ्या अभ्यासक्रमात शिकले तेव्हापासूनच मला खूपच भावले.
सारांश +विश्लेषण :
या पुस्तकातील सगळ्या कथा वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहे. परंतु मी थोडक्यात प्रत्येक कथेचा विषय व मुख्य पात्राविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करते.
या पुस्तकातील पहिली कथा जेव्हा “मी जात चोरली होती!” ही आहे. यामधून त्या काळच्या समाजातील जातीव्यवस्थेवरील भयावह चित्रण केले आहे. या कथेमध्ये असणारा नायक जेव्हा नोकरीसाठी स्वतःची जात लपवतो. त्यानंतरचा त्याचा संघर्ष यातून व्यक्त होतो. ही कथा वाचकाला काही घटना प्रसंगातून अस्वस्थ करते. सद्यपरिस्थितीतसुद्धा काही लोकांना जाव्या लागणाऱ्या पेचप्रसंगाना अधोरेखित करते.
यानंतरची कथा आहे ती म्हणजे भास्कर चंदनशिव यांची 1980 च्या दशकातील “लाल चिखल” ही कथा शेतकऱ्याचे जीवन, त्याचे पीकपाणी, त्यातून उभ्या राहिलेल्या समस्यांवर भाष्य करते. तसेच किशोरवयीन शाळकरी मुलाचे भावविश्व आणि शेतमालाचे बाजार भाव यातून एक दाहक वास्तव पुढे येते. या कथेच्या शीर्षकातून कथेतील शेवटचा अंदाज नक्की येतो. या कथेचा कालक्रम एक दिवसाचा, कमी पात्रे, मोजकेच घटनाप्रसंग आणि तीव्र होत जाणारा संघर्ष यामुळे कथा वाचकांची पकड घेते.
यानंतरची कथा ती म्हणजे “उठावण” सदानंद देशमुख यांची आहे. या कथेतून कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे. कथेचा नायक असणारा शेषराव स्वतःच्या सात क्विंटल कापसाला जास्तीचा बोनस मिळावा या आशेपोटी मोठी कसरत करून तो विक्रीसाठी आणतो. परंतु तिथे असणारी सरकारी व्यवस्था.
“बाजा” नावाची उषाकिरण आत्राम यांची आदिवासी साहित्यातील कथा प्रमुख आहे. या कथेतून आदिवासी पीडितांच्या, वेठबिगारीच्या समस्यांच्या व्यथा यांचा संघर्ष यातून प्रकट होतो.
“वापसी” नावाची अभिराम भडकमकर यांच्या चुडैल या कथासंग्रहातील कथा नाट्यचित्रपटाच्या चंदेरी दुनियेचे, लाइफस्टाईलच्या मोहाचे, संपत्तीचे आकर्षण तरुणाईला भुरळ घालत राहते. त्याचबरोबर सलीमची कोल्हापूर ते मुंबई आणि पुन्हा कोल्हापूरची वापसी करताना त्याला येणाऱ्या अडचणीचे चित्र यामध्ये शब्दबद्ध केले आहे.
ताकद आणि कमतरता :
मला कथेतील आवडलेले पैलू म्हणजे या कथा दलित, वास्तव, मानसिक भावना, न्याय व्यवस्थेवरती असणारे प्रश्न या विषयांना हात घालतात. त्यामुळे समाजातील प्रश्न वाचकांसमोर मांडले जातात. कथा वाचताना वाचक स्वतःला त्यातील एक भाग म्हणून पाहू लागेल अशी मला आशा आहे.
या कथासंग्रहात मला उणीव जाणवलेली एकच कथा वाटली ती म्हणजे “दगड दवाखाना” या कथेचा संदेश वैद्यकीय क्षेत्रातील आदर्शवादाची, माणुसकीची, नैतिक मूल्यांची घसरण यावर भाष्य करणारी आहे, परंतु या कथेचा कालक्रम आणि पात्रे भरपूर असल्यामुळे वाचकाला ती वाचताना कंटाळवाणी वाटू शकते.
वैयक्तिक विचार:
मी महाविद्यालयात शिकत असताना यातील प्रत्येक कथेत मी स्वतःला पाहत होते उदा.लाल चिखलमधील बापू, पाऊस आला मोठा मधील सावी, कष्टाची भाकरी मधील विनायक आणि वापसी मधील सलीम इत्यादी.
या पुस्तकातील कथांच्या शेवटपर्यंत कथाकार वाचकाला सुसंगत ठेवतात. काही कथेतील संवाद, घटना,प्रसंग, विषय, आशय सद्यस्थितीशी निगडित आहे. उदा. “शुभमंगल सावधान” ही विनोदी कथा. सध्या लोकांच्या लग्नसमारंभात केला जाणाऱ्या खर्चाचा तसेच वाढत्या दिखाव्यावरती खोचक परंतु विनोदी टीका कथाकार करतो. “कष्टाची भाकरी” मध्ये विनायक सुद्धा अवकाळी परिस्थितीशी सामना न करता वाईट मार्गाला जात राहतो, जी परिस्थिती आपण समाजात पाहतो की कित्येक तरुण थोडेफार संकट आले की लगेच गळून पडतात परंतु परिस्थितीशी दोन हात करण्याचे धाडस करत नाही. त्यांच्यासाठी ही कथा खूपच प्रेरणादायी ठरू शकते.
निष्कर्ष:
आपल्यापैकी सर्वांना कथा वाचायला नक्की आवडतात. तरी सर्व विद्यार्थ्यांनी साहित्याशी मैत्री या पुस्तकातून केली तर अतिउत्तम.
हे एक अभ्यासपुस्तक आहे. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेपुरते न वाचता त्यातून काहीतरी समजण्यासाठी,शिकण्यासाठी ते नक्की वाचले पाहिजे. प्राध्यापक, पालक, शिक्षक अथवा वाचकांना भूतकाळातील व वर्तमानातील स्थितीवर विचार करण्यासाठी हे पुस्तक अंतर्मुख करते.
अंतिमविचार:
आजच्या आधुनिक जगामध्ये साहित्याच्या कक्षा जरी रुंदावल्या असल्या तरी सुद्धा या पुस्तकातील मराठी कथा तुमच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवण्यामध्ये मदत करतील.
या पुस्तकातून मला मिळालेला सगळ्यात मोठा धडा म्हणजे आपण एक माणूस आहे, त्याप्रमाणे समोरचा देखील एक माणूस आहे त्यामुळे त्याच्याशी आपण त्याच दृष्टिकोनातून पहायला हवे. माणसाची पारख जात, पंथ, पैसा, धर्म, संस्कृती, लिंग, पद या चौकटीतून करू नका. त्यांच्या कौशल्यावरती विश्वास ठेवा.
धन्यवाद.