कादंबरीचा नायक खंडेराव हा ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या जीवनप्रवासाच्या माध्यमातून, नेमाडे यांनी समाजातील विविध घटकांचे, त्यांच्या परस्परसंबंधांचे, आणि सांस्कृतिक मूल्यांचे चित्रण केले आहे. कादंबरीची भाषा आणि ओघवती शैली वाचकाला त्या काळातील ग्रामीण जीवनाच्या जवळ घेवून जाण्यात यशस्वी होते. सुरुवातीला वाचकाला कादंबरी समजायला थोडी अवघड वाटते पण साधारण 50-60 पाने वाचून झाल्यावर थोडी थोडी समजायला लागते. त्यानंतर वाचकाला कादंबरी गुंतवून ठेवायला लागते.
एकंदरीत लेखकाने वाचकांना संदेश दिलेला आहे की व्यक्ति कितीही मोठी झाली तरी त्याची मुळे, त्याची नाळ त्याला आपल्या संस्कृति मध्ये / मुळ ठिकाणी परत येण्यास भाग पाडतात. खंडेरावचा प्रवास आपल्याला आपला प्रवास वाटू लागतो आणि आपण त्यात गुरफटून जातो. मला वाटते हे लेखकाचे यश आहे. पट्टीच्या वाचकाने जरूर वाचावी अशी कादंबरी आहे.