Mrs. Auti Jayshri S., Assit. Librarian college Name- Samarth College of Engineering & Management, Belhe
ययाती –
विष्णू सखाराम खांडेकर यांनी मराठी भाषेत रचलेली ययाती 1959 साली प्रकाशित झाली. अतिशय खूप सुंदर अशी हि कादंबरी आहे.. उत्कृष्ट लिखाण तसेच विचार मांडण्याची पद्धत हि वाखाणण्याजोगी आहे. वाचनाची आवड असलेल्या वाचकांनी हि कादंबरी जरूर वाचावी.या कादंबरीत लेखकाने चंद्रवंशी राजा नहुष यांचा मुलगा राजा ययाती यांच्या जीवनाचा संदर्भ घेऊन समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या काळातील. या कादंबरीला 1960 मध्ये ज्ञानपीठ आणि 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संदर्भ निःसंशयपणे दंतकथेतून घेण्यात आला आहे, परंतु लेखकाची चित्रण शैली तुम्हाला वाटेल की ‘ययाती’ आज प्रत्येक माणूस बनला आहे. खांडेकरजींच्या रचनेत काल्पनिक कथांचे काही भागही समाविष्ट केले आहेत, त्यामुळे ही कादंबरी वाचणे आवश्यक आहे.
ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,” अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.
आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.
त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.