Book Review: Ahire Shubham First Year B Pharmacy,
Divine College of Pharmacy Satana
अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती आशादायी आहे ! पुस्तक वाचून बाजूला ठेवताना वाटलं की, स्वतःला बाजूला ठेवून विचार केला तर किती नव्या गोष्टी जाणवू शकतात ! स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता, कुटुंबातलं आणि देशातलं छोट्यामोठ्या घटनांमधलं नाट्य समजावून घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. गोपाळकृष्ण गांधींनी हे नाट्य समजावून घेतलं आहे आणि समजावून सांगितलं आहे.
स्वतःला केंद्रस्थानी न ठेवणं किंवा आत्मसंकोचाने मागे राहणं हा काही फक्त वैयक्तिक सगुण नाही तर गोपाळकृष्ण गांधी यांच्यासाठी ती इतिहास वाचण्याची, समजावून घेण्याची पद्धत आहे. स्वतः लक्ष वेधून न घेता लक्षवेधक घटनांची नोंद घेण्याची. अर्थातच स्वातंत्र्यापासूनचा सारा इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगण्याचा हा प्रयत्न नाही. त्यामुळे यात काही नवे ऐतिहासिक दस्तावेजांचे संदर्भ नाहीत. सनसनाटी घोषणा (एक अपवाद आहे, त्याकडे नंतर येऊ) नाहीत किंवा इतिहासाचे नवीन सिद्धांत नाहीत. त्याच वेळी हे पुस्तक म्हणजे केवळ स्मृतींचा आलेख नाही. या पुस्तकाबद्दल म्हटलं आहेः या पुस्तकात आहे एका व्यक्तीच्या चष्म्यातून पाहिलेला ८० वर्षांचा इतिहास, वैयक्तिक इतिहास. ही गोष्ट आहे स्वतंत्र भारतातल्या मोठमोठ्या घटनांच्या एका भारतीयाच्या मनावर आणि त्याच्या आयुष्यावर उमटलेल्या पडसादांची.
गोपाळकृष्ण गांधी हे सर्वांना परिचित असलेलं नाव आहे. जर तुमचे एक (वडिलांच्या बाजूचे) आजोबा हे देशाचे राष्ट्रपिता असतील आणि दुसरे (आईच्या बाजूचे) आजोबा हे भारताचे गव्हर्नर जनरल असतील तर लोक तुम्हाला ओळखणार नाहीत, असं असूच शकत नाही. गोपाळकृष्ण गांधी (आणि त्यांची भावंडेही) आपल्या या वारशाबद्दल सहजभाव बाळगून असतात, हेत्यांचं सर्वांत मोठं यश आहे. लेखक म्हणून गोपाळकृष्ण गांधी आपल्या पूर्वजांशी नातं सांगून बडेजाव करत नाहीत किंवा त्यांच्याविषयी अपार भक्तिभाव बाळगून त्यांचा देवही करत नाहीत. अर्थात तरीही ‘गांधी’ या आडनावाचं तुम्ही भांडवल करता, हा त्यांच्यावरील आरोप त्यामुळे पुसला जात नाही. त्यांनी स्वतःच एका पत्रातला मजकूर सांगितला आहेः “तुम्ही नेहमीच गांधी आडनावाचा गैरवापर केला आहे आणि त्या आधारे सोयीची, लाभाची पदं उपभोगली आहेत. तुम्ही अतिशय सामान्य दर्जाचे सहसचिव पदाचे अधिकारी आहात. तुम्हाला काही स्वाभिमान नाही का?”
गोपाळकृष्ण गांधी यांना मी पहिल्यांदा भेटलो २००७ साली. शिक्षण क्षेत्रात ओबीसींना आरक्षण देण्यासाठीचा युक्तिवाद मांडणारा एक लेख मी ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये लिहिला होताः काही दिवसांनी मला पोस्टाने पत्र आलं. (हो, त्या काळात पोस्टाने पत्रं यायची!) त्यावर पत्ता होता, राजभवन, कलकत्ता, पश्चिम बंगाल. पाकिटावर सुवाच्य हस्ताक्षरात माझा पत्ता लिहिलेला होता. त्यावर पोस्टाचे तिकीट होते. (कार्यालयीन संभाषणासाठी तेव्हा स्वतंत्र पोस्टाची तिकिटे असत.) पाकिटाच्या आतमध्ये राज्यपालांच्या लेटरहेडवर पत्र. त्यात लेखाचे कौतुक केले होते आणि पुढे संवाद सुरू राहावा, असे त्यांनी म्हटले होते. एका राज्याचे राज्यपाल स्वतः पत्र लिहून त्यावर स्वतःच्या हाताने पत्ता लिहितात, ही बाब मला खूप विशेष वाटली. मीस्वतःदेखील माझ्या छोट्याशा कार्यालयातील पत्रंही हाताने लिहिणं बंद केलं होतं. राज्यपाल महोदयांची ही केवळ सवय नसावी किंवा हा त्यांचा छंद नसावा तर तो त्यांच्यावरचा संस्कार असावा, असं मला वाटलं.
गोपाळकृष्ण गांधी अवघे अडीच वर्षांचे असताना महात्मा गांधींची हत्या झाली. त्यामुळे महात्मा गांधींहूनही (आईकडचे) आजोबा सी. राजगोपालचारी (राजाजी) यांचा गोपाळकृष्ण गांधींवर अधिक प्रभाव होता. काँग्रेसला बहुमत प्राप्त करण्यात अपयश आलेलं असतानाही राजाजी ज्या प्रकारची गडबड करून तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले ते चुकीचं होतं, हे गोपाळकृष्ण गांधी त्यांच्यावर राजाजींचा अतिशय प्रभाव असतानाही मान्य करतात. ते लिहितात, “हा सर्व घटनाक्रम लोकशाहीशी विसंगत होता. निवडणुकीत लोकांनी दिलेला कौल नाकारणं सर्वथा चुकीचे होतं.” हे त्यांनी स्वतःच लिहून ठेवलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या वारशामध्ये अनेकांनी ‘हरिजन सेवा’ वगैरे म्हटलं असलं, तरी आपल्या जवळच्या मित्रांमध्ये एकही दलित नाही, हे ते खेदाने सांगतात. त्यांनी म्हटलं आहे,
“आमच्या मित्रवर्तुळात मुस्लीम, ख्रिश्चन आणि शीख धर्मीय मित्र आहेत. अमेरिकेतील कृष्णवर्णीय समुदायाचे आणि जगभरातील ज्यू वंशाचे मित्र आहेत; पण एकही भारतीय दलित मित्र नाही.” कठीण काळात नेते काही सभ्यतेचेनैतिकतेचे संकेत पाळत असत, याची आठवणही गोपाळकृष्ण गांधींनी करून दिली आहे. ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांचे सरकार नेहरूंनी चुकीच्या पद्धतीने बरखास्त केले होते पण म्हणून ते नेहरूंच्या मृत्यूनंतर त्याबाबत वाभाडे काढणारे बोलले नाहीत. तसेच उदाहरण जयप्रकाश नारायण यांचे. “चीनी लोकही अखेरीस आपलेच आहेत, आशियाचे मित्रच आहेत.”, १९६२ च्या भारत चीन युद्धानंतर या शब्दांत जयप्रकाश नारायण यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधील कार्यक्रमात श्रोत्यांना आठवण करून दिली होती. अशा प्रकारची परंपरा डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत टिकून होती. ‘सियासत विध शराफत’ (अर्थात सभ्यता असलेली राजवट) टिकवून ठेवलेले ते शेवटचे राजकारणी होते, असे गोपाळकृष्ण गांधी म्हणतात.
गोपाळकृष्ण गांधी याच परंपरेचा भाग आहेत. सांविधानिक पदावरील व्यक्तींनी कसं वर्तन करावं याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी सांविधानिक मर्यादांचं पालन केलं. अगदी नंदीग्राम मुद्द्याच्या वादळी काळातही स्वविवेक आणि निर्भयता या दोन गुणांमुळे त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द निर्णायक ठरली. गोपाळकृष्ण गांधींनी नंदीग्राम संहाराबाबत बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री असलेल्या सरकारला दोषी धरलं आणि चारच दिवसांनी त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डाव्यांनी गांधींचं स्वागत केलं होतं. गोपाळकृष्ण गांधी मुख्यमंत्री भट्टाचार्य यांना म्हणाले, “तुम्हाला माझ्याऐवजी दुसरा राज्यपाल हवा असेल तर तशी विनंती तुम्ही केंद्र सरकारकडे करू शकता.” डावी आघाडी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सोबत होती. बुद्धदेव भट्टाचार्य यांना गोपाळकृष्ण गांधींना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदावरून हटवता आलं असतं; पण तसं न करता ते गांधींना म्हणाले, “मी तशा प्रकारचा माणूस नाही. मी असं कधीही करणार नाही.”
या पुस्तकात मसालेदार, चटपटीत किस्से नाहीत; पण काही व्यक्तिमत्त्वं सुरेख रेखाटली गेली आहेत. उदाहरणार्थ प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रामन हे भारतरत्न स्वीकारण्यास गेले नव्हते, कारण ते पीएचडीच्या मुलाखतींमध्ये कमालीचे व्यग्र होते ! ‘प्रौढीलाकर्तव्याच्या रूपात झाकण्याचं हे उदाहरण’ आहे, असं पुस्तकात म्हटलं आहे; पण याहून आश्चर्यकारक गमतीचा प्रसंग होता टी. एन. शेषन यांचा. “सुशासनाचे मूर्तिमंत उदाहरण असलेला हा माणूस जणू स्वतःलाच पुढे भिरकवणारा असा तोफगोळा होते” असा पुस्तकात उल्लेख आहे.राजीव गांधींच्या हत्येनंतर शेषन राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांना भेटले होते आणि मला देशाचा गृहमंत्री करा, अशी त्यांनी विनंती केली होती, असा खुलासा या पुस्तकात केलेला आहे. इतिहास हा केवळ महान स्त्री- पुरुषांच्या कर्तृत्वातून घडत नाही तर सामान्य माणसांच्याअर्थपूर्ण कृतींमधूनही ती घडत असतो, याची आठवण हे पुस्तक करून देतं. आणखी एक निजामाबाबतचा प्रसंग या पुस्तकात आहेः नामगिरी या राजाजींच्या मुलीला हैदराबादच्या निजामाने हिऱ्यांचा हार भेट दिला. आपली मुलगी विधवा असून ती अशा प्रकारचे दागिने परिधान करू शकत नाही, असं सांगत राजाजींनी तो परत केला. काही वर्षांनी नामगिरीला याचं वाईट वाटलं. हार परत केल्याचा त्यांना पश्चात्ताप झाला नाही; पण विधवा असण्याचं कारण त्यांनी द्यायला नको होते. उलटपक्षी, “आम्ही गांधींचे शिष्य आहोत आम्ही महागड्या वस्तू वापरत नाही,” असं म्हणायला हवं होतं असं त्यांना वाटलं. या प्रसंगाचा शेवट करताना ते म्हणतात, “थोरांच्या कन्या कठीण प्रसंगी आपल्या वाडवडिलांहूनही अधिक सरस ठरतात.”
तुम्हाला यातली एकच गोष्ट वाचायची असेल तर ती आहे मकबूल शेरवानीची. गोपाळ गांधींनी या प्रसंगाचं वर्णन ‘कट्टरतेचा बळी असलेलं आणि असमान्य धैर्याचं उदाहरण’ असं केलं आहे. १९४७ साली पाकिस्तानच्या १४ आदिवासी सैनिकांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली तेव्हा १९ वर्षांच्या मकबूलला पकडलं. मकबूल शेरवानी हा शेख अब्दुल्लांचा अनुयायी. त्याला ‘पाकिस्तान जिंदाबाद, शेर ए काश्मीर मुर्दाबाद’ अशी घोषणा द्यायला सांगितली. मकबूलने नकार दिला तेव्हा त्याला एका खांबाला दोरखंडाने बांधलं गेलं. त्याच्या तळहातावर खिळे ठोकले. पाकिस्तानी सैनिकांनी दिलेली घोषणा तर शेरवानीने दिली नाहीच; उलट त्याने घोषणा दिलीः “हिंदू मुस्लीम एकता जिंदाबाद’ गोपाळकृष्ण गांधी म्हणतात, शेरवानीचा मृत्यू हे हौतात्म्य होतं ज्याचा अभिमान हिंदू, मुस्लीम, शीख किंवा कोणत्याही धर्मीयाला वाटायला हवा.
२२ एप्रिलच्या रात्री अशाच एका धाडसी योद्ध्याने काश्मिरीयत वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. सय्यद आदिल हुसैन शाह या २९ वर्षीय युवकाने पहलगाममध्ये जिवाची बाजी लावली. तो घोड्यावरून पर्यटकांना फेरफटका मारून आणत असे. मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांपैकी हा एकच स्थानिक काश्मिरी होता ज्याने इतर पर्यटकांचा जीव वाचवताना स्वतःचा जीव दिला.