हे पुस्तक म्हणजे फक्त शब्दांची जुळवाजुळव नाही किंवा पानांची गर्दी देखील नाही,
हे पुस्तक म्हणजे जणू लेखकाने हातात लेखणीच्या क्रांतीचा नांगर घेवून तो आपल्या मेंदुवरून खोल खोल भुईत घुसवून जेवढा खोल जाईल तेवढा खोल तळ शोधावा तसा आणि गर गर फिरवावा आपल्या मेंदूच्या प्रत्येक कोपऱ्यातून आणि मोकळी व्हावीत मेंदूत बुरसटेली, गंज चढलेली घट्ट बसलेली चीखलगाळ झालेली मेंदूची ढेकळ
आणि मोकळी करावीत ती भुसभुशीत ढेकळ पुन्हा नव्या पेरणीसाठी नव्या प्रज्वलित मशागतीसाठी पुन्हा क्रांती घडवण्यासाठी. अगदी हीच प्रचिती हे पुस्तक वाचताना येते.
ही कादंबरी वाचताना पानोपानी हे जाणवत राहतं की, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळाच्या आजपर्यंत नेहमीच स्रीला दुय्यम समजले गेले आहे.
अनेक रूढी ,परंपरा, भावकी- गावकी,सोयरे – धायरे, घरचे- दारचे सर्वांनीच तिला नेहमीच अपशकुनीपणाच्या शापाने तिच्या अस्तित्वावर ताशेरे ओढले आहेत. ना ना प्रकारच्या चारित्र्यहननाने तिला कलंकित केले आहे. तरीही ती निमूटपणे विश्वाला पेलवत राहिली स्वतःच सगळं दावणीला लावून. सर्वांचं सगळं उनंदूनं ऐकून घेत बुक्क्यांचा मार सहन करत राहिली. पण जेव्हा एक भाकर तीन चूली हे पुस्तक आपण वाचतो तेव्हा लेखकाचे हदयपूर्वक धन्यवाद द्यावे वाटतात.
अगदी काळजातून, डबडबलेल्या डोळ्यांतून, थरथरत असलेल्या ओठांच्या धीट करत बोल फुटलेल्या शब्दांतून, त्या लेखणीचे, त्या हाताच्या बोटांची एकजूट करून पकड धरलेल्या त्या लेखणीला हात जोडून धन्यवाद द्यावे वाटतात.
हे पुस्तक म्हणजे स्री अस्तित्वाचा तो आवाज आहे ,जो तिच्या अस्तिवाला मान्य करणारा असेल, तिच्या कलंकित आयुष्याला एक नवा आशेच किरण देणारा असेल,
हा तो आवाज आहे आजवर कित्येक जणींनी सोसलं भोगलं पण मूग गिळून गप्प बसत अन्यान सहन करत त्या बोलू शकल्या नाहीत त्यांना वाचा फोडणारा असेल
आणि अनिष्ट रूढी परंपरांच्या उरावर पहार रोवून खांडोळी करणारा असेल.
हा आवाज आई जिजाऊसारखा, क्रांती ज्योती सावित्रीसारखा आणि सिंधुताई सपकाळ यांच्यासारखा वाटतो. खंबीर अशा ताराराणी सारखा.तसलिमा सारखी विद्रोही असणारी ह्यातली नायिका आहे.
जाती जातीत वाटून घेतलेले तुम्ही आम्ही जेव्हा पोटात आग पडते तेव्हा पोटाला भुकेला जात असते का ? या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणारं म्हणजे हे पुस्तक.
महापुरुष महामानव यांनी या मातीला दिलेला विचार पुन्हा नव्या दमाने पेरणी करणारां जाज्वल्य विचार म्हणजे हे पुस्तक!
समाजाने कितीही नाकारले तरीही पुन्हा पुन्हा स्त्री जातीच्या अस्तिवाला मान्य करायला लावणारं म्हणजे हे पुस्तक!
एखाद्या वंचित शोषित घटकाला जात म्हणून नाही तर माणूस म्हणून जगण्याचं सर्व अस्तित्व स्वीकारून सामर्थ्य बहाल करणं , हक्क देणं म्हणजे हे पुस्तक!
पुस्तक वाचताना कुठेही वाचकाची निराशा होत नाही. पुस्तकाची बांधणी ,मुखपृष्ठ आणि शीर्षक हे वाचकाला पहिल्या नजरेतचं विचार करायला भाग पाडते. एकदा सुरुवात केली मग आपण वेडे होवून जातो वाचण्यात कुठेही व्याकरणीय गडबड जाणवत नाही, ग्रामीण बोली भाषेचा सर्वांगाने वापर यात आलेला आहे. प्रत्येक पात्र, नायक नायिका,खलनायक यांना जशास तसे शब्दांत उतरवले आहे.जणू समोरच चालू आहे आणि आपण त्यातलं आहोत हीच प्रचिती येते. प्रत्येक पानात डोळे वाहू लागतात ते हदयाला क्षरण जातात.