Review By Prof. Ganesh Katariya, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा,
असे धाडस बाळगणारा होता एकच तो छावा !
“छावा” कादंबरीमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे क्षण उलगडले आहेत. त्यांच्या मातेसोबत असलेल्या नात्यापासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या सर्व ऐतिहासिक घटनांचा सुसंगत व अचूक विवेचन केला आहे.
शिवाजी सवंत यांनी कादंबरीत संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील मानवी बाजू देखील अत्यंत सुंदरपणे दाखवली आहे. त्यांचा दु:ख, वेदना, कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा आणि आदर्शाचा प्रसंग वाचकांना भावनिक स्तरावर जोडतो. “छावा” कादंबरी शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून साकारलेली एक ऐतिहासिक कादंबरी आहे, जी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या आणि प्रेरणादायी घटकांवर आधारित आहे. कादंबरीमध्ये, त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंना छानपणे उलगडले आहे.३ एप्रिल १६८० ला शिवाजी महाराजही त्यांना सोडून गेले. महाराजांच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थाने वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातात. नंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांची बाजू घेतली आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. या सर्व सुख-दुखांच्या प्रसंगात शंभूपत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर वर्णन छावा मध्ये केले आहे.
संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने खूप लढे दिले, मराठ्यांच्या झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली. संभाजीराजांनी केलेल्या लढायांचे पुस्तकात केलेले वर्णन वाचकाना प्रेरित करतात
गणोजी शिर्के, संभाजीराजांचे सख्खे मेहुणे हे काही गावांच्या वतनांसाठी औरंगजेबाला सामील झाले आणि सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
छत्रपती संभाजीराजे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. संभाजीराजांचे सल्लागार/ मित्र असलेले कवी कलश यांनी मरेपर्यंत आणि कठीण प्रवासातही संभाजीराजांची साथ सोडली नाही.
संभाजीराजांचा मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदय पिळवून टाकणारे वर्णन असलेली शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू भरून येतात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा – इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आली. पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला. यादृष्टीने आजच्या काळात हे पुस्तक तरुण पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे.