Share

पुस्तक परीक्षण -कु. संस्कृती रोहिदास गोडे तृतीय वर्ष वाणिज्य , अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर
बहिर्जी नाईक यांच्यावर पहिलेच पुस्तक असावे. भारतीय राजनीतीशास्त्रामध्ये हेरगिरीचा इतिहास बऱ्यापैकी प्राचीन आहे. ऋग्वेदकाळापासून सुरू झालेला हा प्रवाह व्यास, वाल्मिकी, शुक्राचार्य, भारद्वाज, कौटिल्य अर्थात चाणक्य, कामंदक, तिरुवल्लुवर यांच्यापासून शिवकाळातील बहिर्जी नाईक यांच्यापर्यंत आहे. या प्रदीर्घ हेरगिरीचा संशोधनात्मक आढावा घेणारे पुस्तक लेखक रवी आमले यांनी असंख्य ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिल्याचे दिसते. त्याची सुरुवात अर्थातच ऋग्वेद काळापासून होते. तदनंतर रामायण महाभारतामधील हेररचनेचा आढावा त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीवर तसेच शासनव्यवस्थेमध्ये गुप्तहेर व्यवस्था कशी असावी, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक कौटिल्यांनी लिहिले. त्यातील गुप्तहेरव्यवस्थेची रचना व मांडणी राज्यव्यवस्थेला कशी पूरक असावी अथवा तिने कार्य कसे करावे, याविषयी माहिती कोणत्याही सम्राटाला असायला हवीच अशी आहे. मराठा साम्राज्याची स्थापना करताना छत्रपती शिवरायांचे विचार आणि कौटिल्याचे विचार हे जवळपास जुळत असल्याचे दिसते.
पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये हेरव्यवस्थेच्या वरील ऊहापोहासोबतच मुस्लिम हेरसंस्थांविषयी देखील लेखकाने विस्तृतपणे लिहिलेले आहे. शिवाय भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे मुघल व त्यांची हेरव्यवस्था कशी होती, याचे देखील वर्णन आपल्याला वाचायला मिळते. अगदी बाबर ते औरंगजेबापर्यंत गुप्तहेरांनी कित्येक कारस्थाने तडीस नेली होती, हे देखील समजते. पुस्तकातील दुसरा भाग पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर व त्यांच्या हेरव्यवस्थेवर प्रकाश टाकणार आहे. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख. परंतु ऐतिहासिक पुराव्यांमध्ये त्यांच्याविषयी अतिशय तुरळक माहिती दिसून येते. एका अंगाने हे गुप्तहेर यंत्रणेचे सर्वोत्तम यश आहे, असेच मानायला हवे. परंतु याच कारणास्तव बहिर्जी नाईक व त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेविषयी ठोस माहिती कोणत्याही इतिहासकाराला आजवर सांगता आलेली नाही. तरी देखील रवी आमले यांनी उपलब्ध पुराव्यांचा आधार घेऊन तसेच अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ चाळून शिवाजी महाराजांच्या विविध योजनांमध्ये गुप्तहेर यंत्रणेचा किती मोठा वाटा होता किंबहुना त्यांच्या अनेक योजना केवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणेमुळेच यशस्वीपणे पार पडल्या, हे सिद्ध केले आहे. शिवरायांना खऱ्या अर्थाने गनिमी काव्याच्या चाली खेळताना गुप्तहेर यंत्रणा किती महत्त्वाची आहे, हे समजले होते.. अफजलखानाच्या फौजेशी जावळीच्या खोऱ्यात झालेली लढाई असो किंवा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याची पुण्यात बोटे छाटून केलेली फजिती असो. यामध्ये गुप्तहेर यंत्रणेचा बहुमोल वाटा होता. शिवाय शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा टाकलेल्या छाप्याची यशस्विता देखील गुप्तहेर यंत्रणेवरच आधारलेली होती. अशा अनेक योजना सफलपणे पार पाडण्यासाठी शिवाजी महाराजांनी अतिशय छोट्या छोट्या बाबींचा सखोल अभ्यास केल्याचे दिसते. शिवाजी महाराज हे केवळ राज्यकर्ते नव्हते तर ते एक कुशल सेनानी आणि मराठ्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचे जनक देखील होते, हीच भावना आपल्या मनात तयार होते. अर्थात यामागे बहिर्जी नाईकांनी मराठ्यांच्या मुलखामध्ये तसेच शत्रूच्या गोटामध्ये देखील तयार केलेली सक्षम हेरयंत्रणा कारणीभूत होती, ही गोष्ट सिद्ध होते.
बहिर्जी नाईक यांच्या विषयी आज-काल समाजमाध्यमांद्वारे जनमानसात पसरत असलेल्या स्वयंघोषित व्याख्यातांद्वारे दिली झालेली चुकीची माहिती नक्की कोणती व त्याचा स्त्रोत काय, याचा देखील ऊहापोह या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणांमध्ये आपल्याला वाचता येतो. शिवरायांचे हेर हे त्यांचे तृतीय नेत्र म्हणूनच काम करत होते, याची प्रचिती येते. इतिहासाच्या पानांमध्ये कोणताही पुरावा न सोडणारी शिवाजी महाराजांची हेरयंत्रणा किती सक्षमपणे कार्य करत होती, याची देखील माहिती होते.
हे पुस्तक म्हणजे कादंबरी नाही. परंतु गुप्तहेरांच्या इतिहासाला वैज्ञानिक दृष्टी देणारा एक शास्त्रीय ग्रंथ आहे, असे मानायला काही हरकत नाही.

Recommended Posts

The Undying Light

Sanjay Manohar Memane
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Sanjay Manohar Memane
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More