Share

Student: Sayali Santosh Zolekar
College : SINHGAD COLLEGE OF ENGINEERING
विद्यार्थी: सायली संतोष झोळेकर
महाविद्यालय : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
पुस्तकाच्या नावातच खूप काही समजून येतं. गरिबीतून सुरू झालेला प्रवास एका मध्यमवर्गीय मुलाला त्याच्या स्वप्नांपर्यंत नेऊन पोहोचवतो.
आयपीएस विश्वास नांगरे-पाटील सरांनी मांडलेला त्यांचा स्वतःचा जीवनप्रवास म्हणजेच *मन में है विश्वास* पुस्तक… एका पक्षाप्रमाणे पिंजऱ्यातून बाहेर पडून उंच झेप घ्यावी, अगदी तसंच आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून स्वप्नांचा पाठलाग करून यश कसं संपादन करायचं याच्या सगळ्या गोष्टींची एका प्रेरणादायी मार्गाने सांगड घालणारे हे पुस्तक.
मराठी साहित्यात आत्मकथनांची मोठी परंपरा असली तरीही विश्वास नांगरे-पाटील यांचं प्रकाशित झालेलं आत्मकथन *मन में है विश्वास* ही परंपरा समृद्ध करणारे ठरते. स्वतःविषयी खरं सांगणं हा जीवघेणा अनुभव असतो, तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त केलं आहे. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनतपासणी केली आहे, नातेसंबंधांतील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन त्यांची उकल केली आहे. अत्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
काय लिहावं आणि काय नाही, याचा विचार करण्याआधीच पुस्तकातील शब्दांनी, विचारांनी मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मनाला नवीन उभारी दिली आहे. मा. विश्वास सर म्हणतात, *ध्येयाकडे वाटचाल करताना येणाऱ्या संकटांचा निर्धाराने सामना करा, तुमचा विजय निश्चित आहे.* डोळ्यातील भोळ्या-भाबड्या स्वप्नांना कष्टाची, प्रयत्नांची जोड दिली की यश नक्कीच आपल्या वाट्याला येते.
मा. विश्वास सरांना गावात सगळे *भावड्या* म्हणत. हाच भावड्या स्वतःच्या भूतकाळात खोलवर उतरून यूपीएससीच्या यशाच्या मार्गक्रमणेला अर्थ लावतो. प्रत्येक अनुभव इतक्या पोटतिडकीने मांडतो की आपली संवेदनशीलता क्षणभर तरी भारावून जाते. अत्यंत सहज, सुंदर, ओघवत्या भाषेत अगदी प्रांजळपणे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून आपल्या हातून झालेल्या चुका, बेहोशी, अविचार सगळं काही हातचं राखून न ठेवता लेखकाने मोकळेपणाने आपली कथा सांगितली आहे.
भावड्याचा सुरुवातीचा काळ बरा गेला, पण कॉलेजचा काळ आणि मुंबईतील वास्तव्य खूप हलाखीचं गेलं. खाण्यापिण्याची ददात, राहण्याची दैना – या सगळ्यातून झुंज देत, कष्टाने आणि स्वकर्तृत्वाने भावड्या यूपीएससी (UPSC) परीक्षा पास होऊन आघाडीचा आयपीएस (IPS) अधिकारी बनतो. हे आत्मकथन वाचताना जुन्या आठवणींशी खेळत वर्तमान परिस्थितीशी जुळवून घेत भविष्याला आकार देणारं वाटतं. ही आत्मकथा फक्त भावड्याची नाही, तर आपलीही होते.
दहावी, बारावी, बी.ए.नंतर काय? असा प्रश्न तरुण पिढीसमोर कायम असतो. त्याचं उत्तम उत्तर म्हणजे – *मन में है विश्वास* हे पुस्तक! सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा खेडेगावातील सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगतो, आयपीएस (IPS) अधिकारी होतो, स्वकर्तृत्वाने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरतो आणि तरुणाईच्या मनातील मानबिंदू बनतो. ही सहजसोपी गोष्ट नाही.
यश हे त्यागाशिवाय आणि संघर्षाशिवाय प्राप्त होत नाही. अपयश येऊनही न डगमगता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरा जाणारा व्यक्तीच खरा यशस्वी ठरतो. प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे कोणीतरी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असतं.
*”भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी मला तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं पहायचंय”* असं म्हणणाऱ्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भावड्या बुडाला फोड येईपर्यंत मेहनत करतो आणि अखेर यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) या दोन्ही लढाया जिंकतो.
खऱ्या अर्थाने हे पुस्तक केवळ एक पुस्तक नसून प्रत्येक तरुणाच्या जीवनाला कलाटणी देणारी एक मोठी प्रेरणा आहे. जितकं शिकावं तितकं कमी आणि जितकं समजून घ्यावं तितकंही अपुरं आहे.
*”भावड्या, भावड्या”* म्हणत सुरू झालेला प्रवास जेव्हा *”IPS विश्वास नांगरे-पाटील सर”* इथपर्यंत पोहोचतो, तेव्हा होणाऱ्या आनंदासमोर आभाळही अगदी ठेंगणं वाटतं.
या पुस्तकाविषयी जितकं लिहावं तितकं कमीच आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात विश्वास सरांच्या आत्मकथनाचा खूप मोठा प्रेरणादायी वाटा आहे. त्यांच्या या पुस्तकातून खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्या या पुस्तकाला माझ्यासाठी एक प्रेरणा समजून शेवटी मी एवढंच म्हणेन…
*”रोज उगवणाऱ्या सूर्याचा ही सूर्यास्त होतो,*
*मग तुला अपयशाची भीती कशाला?..*
*आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या तुला,*
*येणाऱ्या आव्हानांची भीती तरी कशाला?…”*

Related Posts

“श्यामची आई”

Padmaja Ubale
Shareनाव : चारुशीला रणदिवे ( बी. एड. प्रथम वर्ष ) महाविद्यालय : कमला शिक्षण संस्थेचे , प्रतिभा शिक्षणशास्र महाविद्यालय ,...
Read More

चंबुखडी ड्रीम्स

Padmaja Ubale
Shareमानवी जीवनातील दुर्दम्य ईच्छाशक्ती, प्रचंड आशावाद व्यक्त करणाऱ्या. जीवनात स्वप्नं पाहणारी, त्याच्या परिपूर्ततेसाठी धडपडणारी आणि स्वप्नं साकार साकारत स्वत:ची उन्नती...
Read More

Mindful Self-Discipline: Living with Purpose and Achieving Your Goals in a World of Distractions

Padmaja Ubale
Shareदिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी ह्या पंधरवढ्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या #वाचन_संकल्प_महाराष्ट्र ह्या वाचन महोत्सव प्रकल्पाबद्दल मागे एका पोस्टला...
Read More