नमस्कार. मी प्रथमेश हरी गवळी लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर्फे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबवला जात आहे. या निमित्ताने पुस्तक परीक्षण केले जात आहे. आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे की जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुमच्या आयुष्यातही नक्की बदल घडेल. जगण राख झाल तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन खचलेल्या मनाला उभारी देत जो व्यक्ती अनुभवाच्या आणि सातत्याच्या जोरावर पुढे जातो तो खरा विजेता ठरतो, पण विजेता होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो, येणारे खाचखळगे, संकटे आणि अडचणीवर संघर्षाने मात करायला शिकवणार हे पुस्तक म्हणजे “अंत अस्ति प्रारंभ – The End is the Beginning”. सोशल मीडियावर मोटिवेशनल व्हिडिओ बनवणारे आणि महाराष्ट्रातील छोट्या आणि मोठ्या हजारो व्यावसायिकांसाठी आपला व्यवसाय सोशल मीडियाचा योग्य वापर करून कसा वाढवायचा या संदर्भात मार्गदर्शन करणारे “श्री वैभव ढुस” यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमधून “अंत अस्ति प्रारंभ – The End is the Beginning”.हे पुस्तक लिहिले आणि विशेष म्हणजे फक्त दोन महिन्यात या पुस्तकाच्या १५,००० पेक्षा जास्त प्रति विकल्या गेल्या. सध्या हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्वात ट्रेडिंग पुस्तक ठरत आहे. या पुस्तकाची किंमत २७० रुपये आहे. शेवट हीच खरी सुरुवात या मूलभूत विचाराने आजच्या तरुणाईला वेगळी दिशा, एक वेगळा विचार देण्याच्या हेतूने लेखकाने आपले मत मांडले आहे. पुस्तक प्रकाशन होण्याआधीच या पुस्तकाला पुरस्कार देखील मिळाले आहे. सगळे संपल्यानंतर देखील पुन्हा नव्याने सुरुवात करता येते, पण हरलेली बाजी पुन्हा जिंकायची असेल तर मेहनत पण त्याच तोडीची करावी लागते. डाव हरला म्हणून हिंमत हरून बसणाऱ्याचं ते काम नव्हे असा संदेश या पुस्तकातून . हे पुस्तक
१)आरंभ हा कठीणच आहे!
२)चुका स्वीकारायला शिका!
३) ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत
४) वेळ प्रत्येकाचे येते!
५) आपली संगतच ठरवते भविष्य!
६) नैराश्य= एक वरदान
७) बदलत्या काळानुरूप बदल स्वीकारायला शिका
८) बोलायला शिका
९) स्वतःची लढाई स्वतः लढा!
१०) गुलामी नाही राज्य करा
११)गुरु कोणाला करावे ?
१२)यशाची व्याख्या नेमकी काय?
१३)तत्त्वांशी निष्ठावंत रहा!
१४)सोशल मीडिया हेच भविष्य
१५)अंत: अस्ति प्रारंभ
या सारख्या पंधरा विषयांवर निगडित आहे. आपल्यात दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणारे आणि आयुष्यात येणाऱ्या नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यावर पेलताना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा आणि आपला माईंडसेट हा सतत सकारात्मक कसा ठेवायचा याचे लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. कसे लढायचं, कसं घडायचं आणि आलेल्या परिस्थितीचा सामना करून कसं पुढे निघायचं याविषयीचे सविस्तर लिखाण या पुस्तकात केले आहे. नक्कीच हे पुस्तक वाचल्यानंतर खचलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवी उभारी मिळेल असा विश्वास आहे. या पुस्तकातील अनेक गोष्टी आपल्याला प्रभावीत करतात. लेखकाने त्यांच्या विचारांची आणि कथा सांगण्याची शैली अतिशय उत्कृष्टपणे विकसित केले आहे. या पुस्तकातील अनेक गोष्टी, घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. जिंकणं आणि हरण यापेक्षाही महत्त्वाचा असतं ते लढणं ही गोष्ट आपल्याला पुस्तक वाचताना जाणवते. गुलामी नाही तर राज्य करायला शिकवणार हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं.